बाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन; लहरी हवामानामुळे हंगामावर संकट
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 23, 2026
- 38
दसऱ्याच्या मुहूर्तावर एपीएमसीत 288 क्विंटलची आवक; चांगल्या प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर 700 रुपये किलोपर्यंत
नवी मुंबई : हिवाळ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या लालबुंद स्ट्रॉबेरीचे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळबाजारात आगमन झाले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (20 ऑक्टोबर) तब्बल 288 क्विंटल स्ट्रॉबेरीची आवक झाली. मात्र, बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतार यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदाचा स्ट्रॉबेरी हंगाम महिनाभराने कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच चांगल्या प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर किलोमागे 600 ते 700 रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना सध्या जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
साधारणतः नोव्हेंबरपासून सुरू होणारा स्ट्रॉबेरीचा हंगाम यंदा ऑक्टोबरमध्येच सुरू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून बाजारात स्ट्रॉबेरीची किरकोळ आवक होत असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर आवकेत वाढ झाली. सध्या नाशिक, सापुतारा आणि महाबळेश्वर परिसरातून स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला आवक कमी असल्याने दर चढे राहतात. फळांचा आकार, प्रतवारी आणि गुणवत्ता यानुसार दरांमध्ये फरक पडत आहे. सध्या घाऊक बाजारात लहान खोक्याची किंमत 150 रुपयांपासून सुरू होत असून, उत्तम प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर 600 ते 700 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत.
- अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानाचा फटका?
स्ट्रॉबेरी हे थंड हवामानात चांगले बहरणारे पीक आहे. त्यामुळे तापमानातील वाढ, अनियमित पाऊस आणि हवामानातील सततचे बदल यांचा फळांच्या वाढीवर, गुणवत्तेवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई हा राज्यातील स्ट्रॉबेरी उत्पादनाचा प्रमुख पट्टा असून, नाशिक परिसरातही या पिकाचे उत्पादन घेतले जाते. प्रतिकूल हवामानामुळे फळांची वाढ मंदावल्यास किंवा उत्पादनाचा कालावधी कमी झाल्यास बाजारातील आवक घटण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दरांवरही होऊ शकतो. - नोव्हेंबरमध्ये आवक वाढण्याची अपेक्षा
दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेली आवक ही स्ट्रॉबेरी हंगामाची नांदी मानली जात आहे. नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील प्रमुख उत्पादक भागांसह राज्याबाहेरील बाजारपेठांतूनही आवक वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, यंदा लहरी हवामानामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हंगाम महिनाभराने कमी राहू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आगामी काळातील थंडीची तीव्रता आणि हवामानाची स्थिती यावर उत्पादन, बाजारातील उपलब्धता आणि दरांचे गणित अवलंबून राहणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai