साडेअठरा मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

उरण : उरण येथील ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामातून तस्करीच्या मार्गाने दुबईत पाठविण्यात येणारा रक्तचंदनाचा साडेअठरा मेट्रिक टनाचा साठा गत सोमवारी जप्त करण्यात आला आहे. मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केलेल्या या रक्तचंदनाच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 7 कोटी 41 लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला अटक केल्याची माहिती डीआरआय अधिकार्‍यांनी गुरुवारी रात्री दिली.

ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामात एका कार्गो कंटेनरमध्ये हॅण्डीक्रॉफ्ट स्टील मेटलच्या नावाखाली 18.50 मेट्रिक टन वजनाचा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा रक्तचंदनाचा साठा यूएई येथील जेबल अली पोर्टमध्ये पाठविण्यात येणार होता. मात्र, मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांना रक्तचंदनाच्या तस्करीची खबर्‍यांकडून कुणकुण लागली होती. खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईच्या डीआरआय अधिकार्‍यांनी छापा टाकून संशयित कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला बुधवारी अटक केली आहे. तपासाअंती या तस्करीशी संबंधित आणखी संशयितांचा डीआरआयकडून शोध घेतला जात आहे.