सिडको अखत्यारितील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागणार

आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांसहीत सिडको वसाहतीत राहणार्‍या नागरिकांच्या काही समस्या अनेक वर्षांपासून सिडकोकडे प्रलंबित आहेत. तसेच सिडकोशी संबंधित काही प्रकल्प रखडले आहेत. वर्षानुवर्ष प्रलंबित व विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असलेले प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची नुकतीच भेट घेतली. 

नवी मुंबईतील काही खाजगी तसेच सिडकोनिर्मित इमारती मोडकळीस आल्या आहेत. यातील काही इमारती पालिकेने धोकादायक ठरवल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता या आधीच्या सरकारने अडीच चटई क्षेत्र मंजुर केले आहे. मात्र ते पुरेसे नसल्याने शासनाने 4 चटीई क्षेत्र द्यावे. तसेच सिडकोनेच विकासक नेमून सदर पुनर्विकास सिडकोमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सिटीसर्वेक्षण करताना ग्रामस्थांनी सादर करावयाची कागदपत्रांची पूर्ततेबाबत माहिती प्रसारित केल्यास पुढील कार्यवाही करण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या. 

 वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 8000 चौ.मी चा भुखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र अद्याप तेथे भवन उभारण्यास सुरुवात झाली नाही. यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले. सीबीडी येथील मरीना प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी 4 एकरचा भुखंड आरक्षित आहे. गेल्या 4 वर्षापासून या प्रकल्पावर कार्यवाही झालेली नाही. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना तर मिळणारच आहे शिवाय रोजगारही उपलब्ध होणार आहे. तरी सिडकोने संबंधितांशी बैठका घेऊन प्रकल्प उभारणीस सुरुवात करण्याची मागणी आ. म्हात्रे यांनी केली. अशा अनेक विषयांवर सदर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सदर सर्वच विषय नवी मुंबई विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असल्याने सदर विषयांवर त्वरित कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात आले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनीही सदर सर्व विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, माजी सभापती संपत शेवाळे, अब्दुल हमीद खान, सिडकोचे किशोर तावडे, फैय्याज खान, श्रीमती अपर्णा वेदूला, मानकर, प्रमोद जाधव उपस्थित होते.