पालिका आयुक्तांच्या बंगल्याला आग

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ येथील आयुक्त बंगल्याला आज दुपारी आग लागली. तातडीने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

नेरुळ रेल्वे स्थानकाच्या शेजारी सेक्टर 15 येथे पालिकेने आयुक्तांसाठी आलिशान बंगला बांधला आहे. त्यात चार बेडरुम, दोन हॉल, तीन बैठक रुम आहेत. सध्या कार्यरत असणारे पालिका आयुक्त अभिजीत बांगर हे आपल्या परिवारासोबत येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी या बंगल्याच्या बाहेरील कॉरिडॉरला आग लागली. आगीची माहिती मिळताच मनपा अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. निवासस्थानातून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट येत असल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. यात कोणतीही जीवीतहानी झाली नसून आयुक्तांचे कुटुंबीय सुखरूप आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप समजले नाही. एक आठवड्यापुर्वीच बंगल्याला रंगरंगोटी करण्यात आली होती.