नव्या खाडीपुलामुळे मच्छीमारांचे नुकसान

नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर होऊ घातलेल्या नव्या खाडी पुलाला कोळी समाजाने कडाडून विरोध केला आहे. या पुलाचं बांधकाम पुढील चार ते पाच वर्षे सुरु राहणार आहे. त्यामुळं याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होईल अशी भीती कोळी समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या पुलामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करावे अशी मागणी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

नवी मुंबईतून मुंबईत प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाशी येथील सायन-पनवेल महामार्गावर तिसरे व ठाणे खाडीवर एकूण चौथे पूल प्रकल्पाचे काम चालू करण्याचे कार्यादेश दिले आहेत. रेल्वे रुळ आणि सध्याचा खाडी पूल यांच्यामध्ये असणार्‍या जागेमध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवातही करण्यात आली आहे. चौथ्या पुलाच्या बांधकामामुळे मासेमारी व्यवसायावर याचा विपरित परिणाम होईल अशी भीती कोळी समाजाकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत आहे. या कामाला मंजुरी देताना स्थानिकांच्या रोजगारावर काय परिणाम होणार आहे याचा विचार एमएसआरडीसीने केला नाही. तसेच विस्तापित हंोणार्‍याच्या पुनर्वसनाकडेही दुर्लक्ष केल्याने नवी मुंबईतील या प्रकल्पग्रस्तांमध्ये अंतोष पसरला आहे. याविषयी माहिती देण्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष दशरश भगत व निशांत भगत यांनी मच्छीमार हक्क चळवळ उभारुन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. खाडीपुलाला आमचा विरोध नाही पण पुलाचे काम सुरु करण्यापुर्वी यामुळे विस्थापित होणार्‍यांचे पुनर्वन करण्याची मागणी केली आहे. 

सदर प्रकल्पाच्या बांधकाम दरम्यान मासेमारी बंद होणार म्हणून मच्छीमारांना 12 नॉटिकलच्या पुढे मासेमारीसाठी जावे लागणार म्हणूनच आधुनिक बोटी आणि जाळी  शासनाने बांधून द्यावीत, सदर प्रकल्प बाधितांना ए. पी. एम. सी च्या धर्तीवर प्रशस्थ होलसेल फिश मार्केट बांधावे, मच्छी विक्रेते व मच्छीमार याना छोटे खाने शीतपेट्या द्यावेत, कुटुंबियांच्या बाधित कुटुंबियाच्या शिक्षित पाल्यांना प्रकल्पग्रस्त दाखले मिळावे प्रकल्पग्रस्त दाखले मिळावेत ,सदर प्रकल्पात बाधित होणारा घाट त्याच बाजूला नवीन सुसज्ज दशक्रिया घाट निर्माण करणे, मच्छीमारासाठी मोडकळीस आलेले जेट्टी नव्याने बांधावे, वाशी गाव मच्छीमार बांधवाना पुलाकडे  जेट्टी कडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड करावे, प्रकल्प बाधित आणि अवलंबितांना पूर्ण  हाराष्ट्रात टोल मुक्ती पास मिळावे, वाशी गाव लगत असलेल्या महामार्गाला मंजूर सर्व्हिस रस्ता त्वरित चालू करणे,वाशी टोलचे रुंदीकरण करावे या प्रमुख मागण्या असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

 रॉल्फस् हक्क नावाने लढणार   
 वाशी खाडी येथील चौथ्या पुलामुळे बाधित होणार्‍या नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी अर्नाळा ते कर्नाळा पर्यंतच्या सर्व मच्छीमार व प्रकल्पग्रस्त संघटनांचा वज्रमुठीचा निर्धार केला आहे. 
पालघर, बृहन्मुंबई, ठाणे-बेलापूर पट्टीतील, उरण ते  पनवेल पर्यंतच्या  क्षेत्रात कार्यरत असणार्‍या विविध मच्छिमार संघटना, संस्था, तसेच अनेक शासनाच्या आणि खाजगी  प्रकल्पानमुळे बाधित शेतकरी, मच्छिमार व समाज यांच्या साठी लढणार्‍या संघटना यांच्या एकत्रित अश्या  रॉल्फस् हक्क संवाद परिषदेचे आयोजन केले होते. 
भविष्यात सर्वच संघर्षाचे लढे  रॉल्फस् हक्क  या एकाच नावाखाली  हे एकत्र येऊन लढण्याचा निश्चय यावेळी सर्वानुमते करण्यात आला.