अमृत पाटील यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

नवी मुंबई ः सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, गायक, गीतकार, संगीतकार, कला शिक्षक अमृत पाटील नेरुळकर यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा 2020 सालचा यशवंतराव चव्हाण सन्मान जाहीर झाला आहे. 19  फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिक भवन नेरुळ येथे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. 

नवी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले नेरुळकर हे प्रतिथयश गायक, गीतकार, संगीतकार असून त्यांची आकाशवाणी, दूरदर्शन, कॅसेट, सीडी, माहिती व चित्रपटाच्या माध्यमातून तिनशेहून अधिक गीते ध्वनिमुद्रित झालेली आहेत. परदेशात मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, थायलंड येथेही त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. त्यांनी स्वरबद्ध व शब्दबद्ध केलेला अविरत नावाचा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे. साहित्याचा व्यासंग असलेल्या नेरुळकर यांची दर्यादिली, मेघमल्हार, पाखरांची शाळा, भजन यात्री ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सामाजिक कार्याची विशेष आवड असलेले नेरुळकर हे स्वर संगम संस्कृतिक संस्था,भूमिपुत्र सेवा समिती व हंसाराम बुवा नेरुळकर प्रतिष्ठान या संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष असून या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विशेषतः आदिवासी भागात गेली 27 वर्षे शंभराहून अधिक उपक्रम राबविलेले आहे. नेरुळकर यांनी स्वछता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, दारूबंदी, हुंडा बंदी, शाळाबाह्य मुले, बालमजुरी आदी विषयांवरील पथनाट्ये  सादर करुन समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य केलेले आहे. नेरुळकर यांना यापूर्वीही नवी मुंबई भूषण, समाज गौरव, कला भूषण, कला गौरव, आदर्श शिक्षक, स्मार्ट टीचर, वृक्ष मित्र, आशादीप असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.