राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भुजबळांंचा गौप्यस्फोट
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 17
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील चर्चेला दुजोरा
मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत आपल्यासमोरच 40 ते 45 मिनिटे चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. अजितदादा गेल्यानंतर आठ महिन्यांनी भुजबळांनी तोंड उघडल्याने त्यांच्या टायमिंगबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. विलीनीकरणाबाबत अनेक प्रतिक्रिया येत असताना भुजबळांनी विलीनीकरणास पाठिंबा दर्शवल्याने त्यांच्या भुमिकेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबर अखेरीस संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात पुन्हा एकदा मोदी सरकार महिलांना 33 टक्के आरक्षण व डिलिमिटेशन बिल आणण्याची चर्चा रंगली आहे. हे बिल मंजुर होण्यासाठी सरकारला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. गृहमंत्री अमित शाह सर्व बाजुंनी हे बहुमत जोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापू लागल्याने त्यामागे संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन तर नाहीना अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार व जयंत पाटील यांच्यात दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात विलीनीकरणाचे वारे वेगाने वाहु लागले आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. आपले ऑपरेशन झाले असताना आजारपणात जयंत पाटील भेटायला आले होते. त्यावेळी आपण दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आले पाहिजे, असे त्यांना सांगितले होते. अजित पवार चांगले नेतृत्व करीत आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका आपण मांडली होती. यावर जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. मात्र, जयंत पाटील यांनी तुम्ही सध्या एनडीएसोबत सत्तेत आहात, तुमच्या सहयोगी पक्षाला हे मान्य होईल का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते, असे आपण सांगितले होते. मात्र, त्यानंतर हा विषय पुढे सरकला नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. आम्ही सध्या ज्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील पाऊल कसे टाकणार? भाजपला दूर ठेवून आम्ही काही निर्णय घेऊ, असे होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपची संमती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचाही विचार करावा लागेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रोहित पवार यांनी आपण एनडीएसोबत जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. शरद पवार यांचीही हीच भुमिका असून आपण आपल्या राजकीय विचारांशी फारकत घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांनीही विलिनीकरणाचा विषय दादांबरोबरच संपला अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे विलीनीकरणानंतर शरद पवार गट एनडीएसोबत जाणार नाही हे स्पष्ट असताना भाजपशी फारकत घेऊन पवारांसोबत जायला तटकरे, प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळ कधीही तयार होणार नाहीत असे असतानाही भुजबळांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेले आठ महिने गप्प असणाऱ्या भुजबळांना आताच कंठ का फुटला अशी चर्चा समाजमाध्यमात आहे.
- सुनेत्राताई आम्हाला विश्वासात घेतील
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे यापूवच स्पष्ट केले आहे. त्यावर भाष्य करताना सुनेत्राताई आम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतील, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट एनडीएमध्ये येणार की, अजित पवार गट इंडिया आघाडीत जाणार, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही आपल्यासह अनेकांची भावना आहे. जुने जाणते नेते पुन्हा एकत्र आले, तर त्याचा आनंदच होईल, असेही ते म्हणाले. - सुप्रिया सुळे आणि पटेल यांची बैठक
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली, संसदेच्या परिसरात दोन्ही नेत्यांची ही भेट झाली असून 35 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. संसदेत दुपारी दोघांनीही एकत्र लंच केले, त्यामुळे विलीनीकरणाची लंच डिप्लोमसी होती की काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणा- संदर्भातील चर्चांना या घडामोडींमुळे वेग आल्याचे दिसून येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai