कोरोना चाचणीत कोणतीही वित्तीय अनियमितता नाही

सदोष कार्यपध्दतीमुळे अतिरिक्त नोंदी ; चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेत बोगस कोरोना चाचणीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी समिती तयार केली होती. या त्रिसदस्यीय चौकशी समितीकडून लाखो कोरोना चाचणी अहवालांचे परीक्षण करण्यात आले असून याबाबतचा 11591 पानी अहवाल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सादर केलेला आहे. यामध्ये सदोष कार्यपध्दतीमुळे शासनाच्या पोर्टवर अतिरिक्त नोंदी झाल्याने निष्पन्न झाले असून कोरोना चाचणीत कोणतीही वित्तीय अनियमितता नाही नसल्याचे आढळून आले. 

हयात नसलेल्या आणि चाचणी न केलेल्या नागरिकांचे अहवाल प्राप्त झाल्याचा प्रकार नोव्हेंबरमध्ये समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे चाचण्यांचा आकडा फुगवण्यासाठी हा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आयुक्तांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती तयार केली होती. समितीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांची 16 जुलै ते दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत कोरोना चाचणी केली आहे व त्यानुसार सदरचा तपशील केंद्रशासनाच्या ICMR संकेतस्थळावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नोंदविला आहे, त्याविषयी नोडल अधिकारी यांनी प्रमाणित करुन दिलेला दिनांकनिहाय तपशील तपासण्यात आला. सदर समितीने वरील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीस दिलेल्या मुद्यांनुसार सखोल चौकशी करून याबाबतचा 11591 पानी अहवाल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सादर केलेला आहे.

समितीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांनी रॅपिड अँटीजेनी टेस्ट करुन घेतली आहे, त्यांच्याकडून माहिती संकलित करुन घेण्याकरीता 1 लक्ष 51 हजार 956 नागरिकांना महानगरपालिकेच्या कॉल सेंटरमार्फत संपर्क साधण्यात आला. त्यामध्ये 1 लक्ष 50 हजार 359 नागरिकांनी चाचणी झाली असल्याचे सांगितले व 1597 इतक्या नागरिकांनी कोरोना चाचणी झाली नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी 1845 कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याकडून कोरोना चाचणी संदर्भात विचारणा करुन माहिती संकलित करण्यात आली. त्यापैकी 1843 नागरिकांनी त्यांची कोरोना चाचणी झाली असल्याचे सांगितले व 02 नागरीकांनी त्यांची कोरोना चाचणी झाली नसल्याचे सांगितले. मात्र त्यांची नावे माहिती नोंदणीकार यांच्या चुकीमुळे ICMR संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे असे दिसते. चौकशी समितीने मध्यवर्ती औषध भांडारगृहाकडून संपूर्ण अभिलेख उपलब्ध करुन घेतला व त्याची सखोल तपासणी केली. त्यामध्ये एकूण 2 लक्ष 40 हजार इतक्या रॅपिड अ‍ॅन्टीजन किट्स खरेदी केल्याच्या नोंदी आढळल्या. त्यामधील 2 लक्ष 13 हजार 604 इतक्या किट्स वापरात आल्या असून 4717 एवढ्या किट्स सदोष असल्याचे आढळून आले. तसेच मध्यवर्ती औषध भांडारगृह व विविध केंद्रांवर 21 हजार 679 किट्स शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.

तथापि ICMR संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेल्या चाचणीची संख्या 2 लक्ष 21 हजार 476 एवढी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ICMR संकेतस्थळावर 7872 एवढ्या अतिरिक्त नोंदी झाल्याचे आढळून आले, जे नोंदणीच्या सदोष कार्यपध्दतीमुळे झाल्याचे दिसून येते. यानुसार त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्तीय अनियमितता आढळून आलेली नाही. परिणामी ICMR पोर्टलवर 7872 नावांची चाचणी न होता चुकीच्या नोंदी होणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन नियमानुसार कडक कारवाई करावी असे निष्कर्ष समितीने नोंदविलेले आहेत.

  • चौकशी समितीची कार्यकक्षा  
    1. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जुलै पासून रॅपीड  अँन्टीजेन टेस्ट करण्यात आलेल्या काही व्यक्तींकडून समक्ष माहिती घेतली जावी व त्यानुसार त्यांची प्रत्यक्षात टेस्ट करण्यात आली आहे किंवा नाही याबाबत खात्री करुन निरीक्षण नोंदविणे.
    2. महानगरपालिकेच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून  अँन्टीजन टेस्ट पॉझिटीव्ह / निगेटिव्ह नोंदीत व्यक्तींना दूरध्वनी करुन त्यांची टेस्ट करण्यात आली आहे का? व असल्यास त्या कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे याबाबत निरीक्षण नोंदविणे. 
    3. नवी मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या एकूण  अँन्टीजन टेस्ट किटस्, प्रत्यक्षात वापर करण्यात आलेले किटस् व वापर न झालेले किटस् यांची तपासणी करुन सविस्तर अहवाल सादर करणे.


कोव्हीड चाचण्यांबाबतचे हे काम अत्यंत संवेदनशील व महत्वाचे आहे. यामध्ये डेटा एन्ट्री स्वरूपातील त्रुटी असल्या तरी याचे स्वरूप गंभीर असून दुर्लक्षणीय नाही. एका बाजूला महानगरपालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी संपूर्ण क्षमतेने कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची कार्यवाही प्रभावीपणे करीत असताना अशा पध्दतीने चूक होणे व त्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे हे स्विकारार्ह नाही. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे जबाबदारी निश्चित करुन आवश्यक कारवाई करण्यात येईल.  
-आयुक्त अभिजित बांगर