कोरोना उपचार पध्दतीबाबत वेब संवाद

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच तेथील वैद्यकीय व्यवस्थापनाकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त बांगर यांच्या संकल्पनेतून कोव्हीड सेंटरकरीता नियुक्त वैद्यकीय अधिकारी यांचेकरिता वैद्यकीय व्यवस्थापनाविषयी विशेष वेब चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रिलायन्स रुग्णालयाचे क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. भरत जग्यासी यांनी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांशी संवाद साधत कोरोना बाधीतांवरील उपचारांविषयी विस्तृत चर्चा केली.

सध्याचे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे वेगळे स्वरुप लक्षात घेता महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दैनंदिन रुग्णालय व्यवस्थापनात येणारे अनुभव सांगितले. त्यावर भाष्य करत डॉ. जग्यासी यांनी त्यांचे शंका निरसन केले. यामध्ये रेमडिसिव्हर कोणत्या रूग्णांसाठी आवश्यक असते व कोणत्या कालावधीत त्याचा वापर करणे परिणामकारक ठरते, स्टिरॉईडचा वापर कोणत्या कालावधीत परिणामकारक होतो, कोव्हीड लक्षणे न दिसणारे अथवा अत्यंत सौम्य लक्षणे असणारे अशा कोरोनाबाधितांवर उपचारपध्दती काय असावी, आयसीयू बेड्सची वाढती मागणी लक्षात घेता आयसीयू बेडवरील टर्न अराऊंड टाईम कमी करण्यासाठी स्टेप डाऊन फॅसिलिटीचा वापर कशा रितीने करण्यात यावा अशा विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेटर, राधास्वामी आणि निर्यात भवन या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुविधा असून याठिकाणी ऑक्सिजनवर असणार्‍या रूग्णांना जर अधिक परिणामकारक रूग्णसेवा उपलब्ध करून दिली तर त्यांचे आयसीयू सुविधेमध्ये स्थानांतर टाळता येईल यादृष्टीने विस्तृत विचारविनीमय करण्यात आला. आयुक्त अभिजीत बांगर यांनी सद्यस्थितीत कोरोना बाधीतांपैकी मृत्यू होणार्‍या प्रमाणात 80 टक्क्याहून अधिक मृत्यू हे 50 वर्षाहून अधिक वयोगटातील होत असल्याचे हे अधोरेखीत करीत 50 वर्षावरील कोरोना बाधीत व्यक्ती जर गृह विलगीकरणात असेल तर त्यावर करावयाच्या उपचार पध्दती विषयी विस्तृत चर्चा घडवून आणली. अशाप्रकारच्या चर्चा सत्रांमधून कोरोना बाधीतांवरील उपचार पध्दतीला निश्चित दिशा मिळण्यासाठी सहाय्य होत असून याचा उपयोग रुग्णाच्या वैद्यकीय व्यवस्थापनेतील सुधारणेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.