1 जुलैला मिळणार सिडको घरांचा ताबा
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2021
- 458
2018-19 मधील लाभार्थ्यांना सिडकोचा दिलासा
नवी मुंबई ःसिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार असल्याने प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25,000 घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती. या योजनेतील घरांचा ताबा, गृहनिर्माण योजनेच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर 2020 पर्यंत देणे विहित होते. परंतु सन 2020 च्या प्रारंभी आलेली कोविड-19 महासाथ व त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे बहुतांशी विकास प्रकल्पांचे काम मंदावले किंवा ठप्प झाले. सिडकोची महागृहनिर्माण योजनाही त्यास अपवाद नव्हती. सार्वजनिक परिवहन सेवांवरील निर्बंध, मजुरांचे स्थलांतर अशा विविध कारणांमुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. तद्नंतर 15 एप्रिल 2021 पासून राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्येही या समस्या कायम आहेत. या काळात सर्वत्र निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना सिडकोलाही करावा लागला. परंतु ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीनुसार या सर्व अडीअडचणींवर मात करून, पुरेसे मजूर तैनात करून, सिडकोतील अभियंते व अधिकार्यांनी अहोरात्र काम करीत योजनेतील घरांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील विजेत्या अर्जदारांना देण्यात येणारा घरांचा ताबा हे कोविड-19 महासाथीच्या काळात सर्वांत लवकर पूर्ण झालेल्या महाप्रकल्पाचे देशातील एकमेव उदाहरण आहे.
सदर महागृहनिर्माण योजनेतील ज्या अर्जदारांनी घरांचे सर्व हफ्ते भरले आहेत त्यांना बाकी असलेले किरकोळ शुल्क भरण्यास 1 जून 2021 पासून 1 महिन्याची मुदत देण्यात येईल व 1 जुलै 2021 पासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. हफ्ते थकीत असलेल्या अर्जदारांना यापूर्वीच हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai