यंदाही जमिनीची राखीव किंमत जैसे थेच
- by Aajchi Navi Mumbai
- May 28, 2021
- 496
आर्थिक वर्ष 2021-22 करीता बांधकाम क्षेत्राला सिडकोचा दिलासा
नवी मुंबई ः कोविड-19 महासाथीचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचे आर्थिक उपक्रमांवर होणारे विपरीत परिणाम, यांचा विचार करून सिडको महामंडळाने आर्थिक वर्ष 2021-22 करीताही नवी मुंबईतील विविध नोड आणि जवळपासच्या परिसरातील जमिनींच्या राखीव किंमती गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
सध्याच्या प्रचलित राखीव किंमतींचे 31 मार्च 2021 रोजी पुनरीक्षण करणे नियोजित होते. मात्र टाळेबंदीमुळे मागील वर्षभरापासून बांधकाम क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनानेही बांधकाम क्षेत्राला बळकटी देण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेला गती मिळवून देण्याकरिता 2021-22 या वर्षात शीघ्र गणक दरांमध्ये (रेडी रेकनर रेटस्) वाढ न करण्याचा निर्णय घेऊन, 2020-21 मधील शीघ्र गणक दर 2021-22 या वर्षातही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको संचालक मंडळातर्फेही गेल्या वर्षीप्रमाणेच चालु आर्थिक वर्ष 2021-22 करीता, म्हणजे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत नवी मुंबईच्या विविध नोडमधील आणि जवळपासच्या परिसरातील जमिनींच्या राखीव किंमती गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचालक मंडळाने मंजुरी दिलेली राखीव किंमत ही एक वर्षाकरिता वैध असते. त्यानंतर प्रकल्प अहवालाच्या आधारावर नवीन राखीव किंमत निश्चित केली जाईपर्यंत संचालक मंडळाकडून वेळोवेळी ठरवण्यात आल्यानुसार वर्तमानातील राखीव किंमतीची 5% ते 15% मूल्यवृद्धी होते. राखीव किंमतीच्या आधारावर नोडमधील विविध वापरासाठी असलेल्या जमिनींची किंमत संचालक मंडळाने मंजूर केलेल्या जमीन मूल्यनिर्धारण आणि विनियोग धोरणानुसार निश्चित करण्यात येते. यंदा जमिनीचे राखीव दर जैसे थेच ठेवण्याच्या सिडकोच्या निर्णयामुळे निवासी व वाणिज्यिक उपक्रमांसह एकंदर बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे.
कशी ठरते राखीव किमंत
अविकसित जमिनीची किंमत, सर्व प्रकारच्या भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधांची निर्मिती, उपखर्च, व्याज इत्यांदीसह जमीन विकसित करण्यासाठी येणारा खर्च विचारात घेऊन, भविष्यातील वर्षनिहाय खर्चाचा विचार करून वर्तमानातील किंमत निश्चित करण्यात येऊन विक्रीयोग्य जमिनीची राखीव किंमत काढली जाते. राखीव किंमत ही एकूण वसुलीयोग्य किंमतीचे वर्तमानातील मूल्य आणि उर्वरित विक्रीयोग्य क्षेत्र या सूत्रावर आधारित आहे. प्रति चौ.मी. प्रमाणे राखीव किंमतीची गणना करण्यात येते. या सूत्रांचा वापर करून दरवर्षी राखीव किंमत ठरविण्यात येते.
कोविड-19 महासाथ व त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण आर्थिक संकटाचा विचार करून सिडकोने नवी मुंबई आणि जवळपासच्या परिसरातील जमिनीच्या राखीव किंमती गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळून घरांच्या किंमती स्थिरावण्यासही मदत होईल. - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai