केटामाइन इंजेक्शन देऊन प्रेयसीची हत्या

पनवेल ः प्रियकराने केटामाइनचं इंजेक्शन देऊन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला जीवघेणा आजार झाला होता मात्र तरीही तीने लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र आपण तिच्यासोबत लग्न करु इच्छित नसल्याने हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

29 मे रोजी प्रस्तावित विमानतळ असणार्‍या ठिकाणी एका 35 ते 40 वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला होता. यानंतर पनवेल शहर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला होता. घटनास्थळी कोणतंही ओळखपत्र किंवा कागदपत्रं सापडली नसल्याने मृतदेहाची ओळख पटली नव्हती. रविवारी एका रिक्षाचालकाला प्लास्टिक बॅग सापडली ज्यामध्ये आधार कार्ड, पर्स आणि महिलेचे कपडे होते. त्याअनुषंगाने पीडित महिलेचा भाऊ रमेश ठोंबरे याला पोलीस ठाण्यात बोलावले अशता त्याने मृतदेहाची ओळख पटवली. रिक्षाचालकाला मिळालेलं सामान आपल्या बहिणीचं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. रमेश ठोंबरे याने पनवेलमधील रुग्णालयात काम करणार्‍या चंद्रकांत गिरकर नावाच्या व्यक्तीशी आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध होते अशी माहिती दिली. यानंतर पोलीसांनी चंद्रकांत गिरकर याला चौकशीसाठी बोलावले असता त्यानेे गुन्हा कबूल केला. गेल्या सहा महिन्यांपासून आपले महिलेसोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिला. तिला गंभीर आजार होता तरीही ती लग्न करायचा आग्रह करुन नेहमी वाद घालत होती. सतत धमकी देत होती. तिच्या त्रासाला कंटाळून  आरोपीने हत्येचा निर्णय घेतला. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने चार वेगवेगळे इंजेक्शन आणि केटामाइनचं इंजेक्शन घेतलं आणि प्रेयसीला यामुळे ती बरी होशील असं खोटं सांगितलं. हत्या केल्यानंतर त्याने महिलेचा मोबाइल फोन आणि बॅग फेकून देत पुरावे नष्ट केले होते. आरोपी गायकरला न्यायालयात हजर केलं असता 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.