खारघरमधील बोगस डॉक्टरला अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 23, 2021
- 565
पनवेल महानगरपालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई
पनवेल ः मेडीकल कौन्सिलची कुठल्याही प्रकारची डिग्री नसताना, वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना खारघर सेक्टर-15 मधील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून काम करणार्या व रुग्णांच्या आरोग्याशी खेळणार्या बोगस डॉक्टरला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल महापालिका व पोलीसांनी संयुक्त कारवाई करुन या डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.
रोहित गुफ्तेश्वर यादव (27) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणार्या बोगस डॉक्टरवर आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या परवानगीने मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भक्तराज भोईटे, डॉ.सुरेश पंडित, विजय महाले, स्टाफ नर्स संगीता पाटील, विकास तीरगुळ यांच्या मदतीने खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त स्टींग ऑपरेशन करुन या बोगस डॉक्टरला पकडले. विशेष म्हणजे शिवाजी नगर पोलिसांनी या बोगस डॉक्टरला दोन वर्षांपूर्वी अटक केल्यानंतर तो जामीन मिळवून बाहेर आला होता. त्यानंतरदेखील त्याने पुन्हा डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले आहे. खारघर सेक्टर-15 मधील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर काम करत असल्याची तक्रार अॅड.चित्रा साळुंखे यांनी खारघर पोलिसांना दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने सदर बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी पनवेल महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्तराज भोईटे व त्यांच्या पथकाने पथकातील व्यक्तीला पोटात दुखत असल्याचे भासवून त्याला मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवले. यावेळी रात्रपाळीवर असलेल्या बोगस डॉक्टर रोहीत यादव याने त्याची तपासणी केली. तसेच त्याला इंजेक्शन व औषधाची गरज असल्याचे सांगून त्याला मेडीकल मधून औषधे आणण्यास चिट्ठी लिहून दिली. याबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह सदर हॉस्पिटलमध्ये छापा मारला. त्यानंतर त्यांनी बोगस डॉक्टर रोहित यादव याच्याकडे चौकशी केली असता, तो सदर हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत आरएमओ असल्याचे तसेच तो रुग्ण तपासण्याचे व औषध देण्याचे व रुग्णांवर रात्रपाळीच्या वेळेस पूर्णत: नियंत्रण ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वैद्यकीय डिग्रीबाबत चौकशी केली असता, त्याने कुठल्याही प्रकारची डिग्री नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदर पथकाने हॉस्पिटलकडून त्याची माहिती घेतली असता, रोहित यादव याने त्यावेळी 5 रुग्णांची तपासणी केल्याचे तसेच तो मागील दोन महिन्यांपासून या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासण्याचे व त्यांच्यावर उपचार करत असल्याचे आढळून आले. रोहित यादव हा बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खारघर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालये व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा आहे, त्यांनी आपल्या रुग्णालयातील डॉक्टर्सचे मूळ प्रमाणपत्र तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्या बनावट डॉक्टरवर कडक कारवाई केली जाईल. विनाकारण त्या रूग्णालयालाही त्रास होऊ शकतो. यापुढे महानगरपालिका कार्यक्षेत्रात असे बनावट डॉक्टर आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वैद्यकीय आरोग्य विभागास दिल्या आहेत.
- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai