न्हावाशेवा टप्पा 3 योजनेचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 22
लोकप्रतिनिधींच्या आग्रहानंतर एमजेपीचे आश्वासन
पनवेल : हिवाळ्यातच पनवेल, खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असून, अनेक भागांतील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या तालुक्यातील 90 टक्के गावांमध्ये बोअरवेलवर तहान भागवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विविध सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांची व पनवेलच्या लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळा सुरू होईपर्यंत तरी पाण्याचे नियोजनासाठी नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील जलसाठ्यांचे नियोजन, पाणी आरक्षण आणि आगामी काळातील पाणीपुरवठा यावर चर्चा झाली. जलस्रोतांमधील पाणी प्रथम पिण्यासाठी, त्यानंतर जनावरांसाठी आणि शेवटी उद्योग व बांधकामांसाठी वापरण्याचे धोरण पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रायगड जिल्ह्यातील मोरबे, हेटवणे, भिरा आणि कोंढाणे यांसह विविध धरणांतील पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा स्थापन करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘रायगड स्टेम अथॉरिटी’ स्थापन करण्याची मागणी केली होती. या विषयावर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्यानुसार लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. पनवेल महापालिका आणि सिडको क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी न्हावाशेवा टप्पा 3 योजनेचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा आग्रह बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींकडून धरण्यात आला. या योजनेचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे यांनी मार्च 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आ. ठाकूर यांनी पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यास स्थगिती देण्याची मागणी केली. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था (रेन वॉटर हार्वेस्टिंग) किती बांधकाम व्यावसायिकांनी केली, याची माहिती सादर करण्याची मागणीही त्यांनी केली. ही व्यवस्था नसलेल्या बांधकामांना पाण्याचे नियोजन होईपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. मात्र, रेरा नियमांनुसार सरसकट प्रमाणपत्र रोखता येणार नसल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. याबाबत माहिती घेऊन निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी मांडली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai