दरड कोसळल्याने 36 जणांचा दुर्दैवी अंत

रायगड ः कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे 32 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर, याच भागातील साखर सुतारवाडी येथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथील घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास 32 घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.

तळई गावात दरड कोसळल्यामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय हृदय हेलावणारी अशी घटना या गावात घडली आहे. या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत, त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले, असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. माणगाव गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महाडमधील परिस्थितीत कोरोना तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये, याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले आहे.