हल्लेखोरांसह 19 लाखांची रोकड जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 11, 2021
- 714
नवी मुंबई : बीड आंबेजोगाई येथून खासगी ट्रव्हल्स बसने आलेल्या सोन्याच्या व्यापार्यावर शस्राने हल्ला करुन त्यांच्याजवळ असलेली 19 लाख रुपयांची रोख रक्कम लुटून फरार झालेल्या टोळीतील 6 दरोडेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीने लुटलेली संपुर्ण रक्कम हस्तगत करण्यात तसेच या गुह्यात वापरण्यात आलेली हत्यारे व दोन वाहने जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिकेत जोमा म्हात्रे (23), कार्तिक सुशिल सिन्हा (24), किरण विजय पवार (21), भिमा रामराव पवार (21), मनोज गुरम्या राठोड (22) आणि लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ लकी उर्फ वाघ्या (21) या सहा जणांचा समावेश आहे. या घटनेतील तक्रारदार संतोष जाधव (37) हे बीड येथील आंबेजोगाई येथील सोन्याचे व्यापारी असून ते प्रत्येक शुक्रवारी रात्री आंबेजोगाई येथून खाजगी ट्रव्हल्स बसमधून शनिवारी सकाळी मुंबईत दागिने खरेदी करण्यासाठी लाखो रुपये सोबत घेऊन येत असत. लुटण्यात आलेले व्यापारी आणि अटक आरोपी अनिकेत म्हात्रे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सदर व्यापारी प्रत्येक शनिवारी कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोर सकाळी सातच्या सुमारास उतरुन अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याच्या परिचयाच्या व्यक्तिकडे फ्रेश होण्यासाठी जात असत. त्यांनतर ते सोने खरेदी करून पुन्हा संध्याकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बसने मूळगावी परत जात असत. ही संपूर्ण माहिती अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याने त्याच्या इतर साथीदारांना देऊन दरोडा टाकून लुटण्याचा कट रचला. गत 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संतोष जाधव सोने खरेदी करण्यासाठी आपल्या सोबत 19 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन खाजगी ट्रव्हल्स बसने कळंबोली येथे उतरले असताना, अनिकेत म्हात्रे व त्याच्या साथिदारांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकुन तसेच त्यांच्यावर धारधार शस्राने हल्ला करुन त्यांच्या जवळ असलेली 19 लाख रुपयांची रोख रक्कम लुटून पलायन केले होते.
या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी संतोष जाधव यांना रुग्णालयात दाखल करुन अज्ञात लुटारु विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य पहाता पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे व त्यांच्या पथकाने जखमी संतोष जाधव, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळावरील सिसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. तसेच तांत्रिक तपास करुन या गुह्यात सहभागी असलेल्या सहा आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून 3 घातक शस्रे, व सदर गुह्यात लुटलेली संपुर्ण रक्कम दोन वाहने जफ्त करण्यात यश आल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai