जॉगर्स पार्कवर दुर्गंधीचा भपकारा
- by विजय आहिरे
- Jun 02, 2023
- 384
मिनी सी-शोअरममध्ये नागरिकांचा श्वास गुदमरतोय
नवी मुंबई : वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरामध्ये असणाऱ्या राजीव गांधी जॉगर्स पार्क वर चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा दुर्गंधीने श्वास गुदमरतो आहे. होल्डिंग पाँडमध्ये अनेक दिवसांपासून साठून राहिलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. आरोग्य चांगले राहावे याकरिता चालण्यासाठी इथे येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा भपकारा येत असल्याने नाकावर हात ठेवूनच चालावे लागत आहे. त्यामुळे शुद्ध हवा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमधून महापालिकेच्या या व्यवस्थापनाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वाशीमधील मिनी सी-शोअरचा परिसर नागरिकांनी नेहमी गजबजलेला असतो. मोकळा परिसर असल्याने शहरातील वाशी, कोपखैरणे, तुर्भे, घणसोलीसह अन्य ठिकाणांहून ज्येष्ठांसह लहान मुले व त्यांचे पालक या ठिकाणी येत असतात. सर्व सुविधांनी युक्त असल्यामुळे या जॉगर्स पार्कवर सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या जॉगर्स पार्कला लागूनच होल्डिंग पाँड आहे. समुद्राच्या उधाणाचे पाणी या पाँडमध्ये साठवले जाते व नंतर आहोटीच्या वेळी पुन्हा सोडले जाते. काही वर्षांपूर्वी या पाँडमधील पाण्यावर बोटिंगचीही सुविधाही सुरू करण्यात आली होती. जी कालांतराने बंद झाली आहे. काही महिन्यांपासून या होल्डिंग पाँडमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाण्यावर शेवाळ तयार होऊन त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. तसेच पाँडमधील पाणी काही प्रमाणात आटल्याने चिखल व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. जॉगर्स पार्कवरून चालताना हवेच्या लाटे बरोबर येथील दुर्गंधीचा भपकारा येत असल्याने नागरिकांना नाकावर हात ठेवून चालावे लागत आहे. होल्डिंग पाँडचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याने शुद्ध हवेच्या आशेपोटी येथे आलेल्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या पाँडच्या व्यवस्थापनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करून नवीन पाणी भरावे व त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे अशी मागणी येथे येणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य राखण्यासाठी नागरिक येथे येत असतात. त्यांना साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. होल्डिंग पाँडच्या स्वच्छतेकडे संबंधितांनी लवकरात लवकर लक्ष देऊन योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. - सुरेश तुकाराम शिंदे, समाजसेवक, वाशी
शुद्ध हवा घेण्यासाठी आम्ही इथे येत असतो आणि इथे आल्यानंतर मात्र दुर्गंधीमुळे आमचा श्वास गुदमरतो आहे. अनेक दिवसांपासून हा त्रास सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे. - रामकृष्ण भोईर, नागरिक
1) नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत या होल्डिंग पाँडचे व्यवस्थापन करण्यात येते.
2) पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर या होल्डिंग पाँडची स्वच्छता करण्यात येते.
3) पावसाळ्यापूर्वी लवकरच या पाँडची स्वच्छता करणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे