Breaking News
पुनर्विचार करण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार
मुंबई : मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेले अपिल गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे मानहानीप्रकरणात कोणताही दिलासा राहुल गांधींना उच्च न्यायालयाकडून न मिळाल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे त्यांची खासदारकी रद्दच राहणार असून दोन वर्षांची शिक्षा कायम असणार आहे.
कर्नाटकमध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील (2019) प्रचारावेळी राहुल यांनी मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली. त्याबद्दल गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे संपुर्ण मोदी आडनावाच्या समाजाची मानहानी झाल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेनंतर संसदेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती. सदर दोन वर्षाच्या शिक्षेच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून त्यांनी सत्र न्यायालयात याचिका केली होती. सत्र न्यायालयाने गांधी यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवरील सुनावणी पुर्ण होऊन न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयाने गांधी यांचे अपील फेटाळले असून कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. निकाल सुनावतेवेळी न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात किमान 10 खटले विचाराधीन असून हा खटला दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशात प्रकरणात त्यांना दोषी ठरवले जात असेल तर त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. आम्हाला कनिष्ठ न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याची काहीच गरज वाटत नाही असे निरिक्षण त्यांनी निकालात नोंदवले आहे. राहुल गांधींकडे सध्या दोन पर्याय आहेत. राहुल गांधी हायकोर्टाच्या या निर्णयाला थेट ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. परंतु राहुल गांधींचे खासदार म्हणून निलंबन देखील कायम राहणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai