Breaking News
लायकी नसणाऱ्यांना जबाबदारीचे पद दिल्यावर तो कसा वाह्यात वागतो याचं अलिकडचे उदाहरण म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेता येईल. प्रदेशाध्यक्ष कसा नसावा याचा उत्तम परिपाठ बावनकुळे यांनी भाजपला घालून दिला आहे. त्यांच्या या बोलघेवडेपणाचा फटका भाजप वगळता सगळ्याच पक्षांना बसला आहे. त्यातून पत्रकारही सूटले नाहीत. आपल्या पक्षाला टिकेपासून दूर ठेवायचं असेल तर पत्रकारांना धाब्यावर घेऊन जा, असा अनाहूत सल्ला त्यांनी पक्षाच्या तालुका आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांना दिला आहे. तिथे त्यांना काळा चहा पाजायचा की दुधाचा, हे ठरवून त्यांच्यापुढे जे पाहिजे ते ठेवा, असा मोलाचा सल्ला दिला. हा सल्ला त्यांनी काळा चहा कि दुधाचा चहा पिऊन दिला हा संशोधनाचा विषय ठरेल. जे पाहिजे ते म्हणजे काय, हे हवं तर सुजय विखेंना विचारा, ते याचा चांगला बंदोबस्त करतील, असंही ते बरळले. सुजय यांना याचं काही वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पत्रकारांना आपल्या खिशात घातल्याचे सुजय यांचे उद्योग बावनकुळ्यांना माहीत असावेत. देशभरात सुरू असलेल्या भाजपच्या या कृतीमुळे आज मिडीयाला गोदी मिडीया म्हणून संबोधले जात आहे. तेच त्यांना महाराष्ट्रात करायचे आहे. त्यामुळे बावनकुळ्यांच्या पोटातलं ओठावर आलं इतकंच.
भाजपने पोसलेल्या असल्या बोलघेवड्या पदाधिकाऱ्यांचा समाचार घेणे गरजेचे आहे कारण ‘तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा'. बावनकुळे ही देवेंद्र फडणवीसांची भाजपला देण आहे. कोणतेही कतृत्व नसताना याला फडणवीसांनी मंत्रीपद देऊन आपल्या ताटाखालचं मांजर केले होते. नितीन गडकरी यांची पाठ सोडावी, या कूट नीतीसाठी बावनकुळेंना मंत्रिपदाची ही खिराफत होती. मंत्री म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी दाखवून दिलेल्या करामतींनी सारा महाराष्ट्र आश्चर्यात बुडाला. वळणावरच पाणी अखेर वळणावरच जातं, तसं बावनकुळेंचं झालं. हे लक्षात आल्यावर विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीसांनी त्यांना दूर केलं. कोणाही स्वाभीमानी व्यक्तीने हे सहन केलं नसतं. मंत्री म्हणून आपण भरीव कामगिरी केली असेल तर मागणी न करता उमेदवारी मिळणं हा त्या व्यक्तीचा अधिकार असतो. हा अधिकार त्यांनी स्वकतृत्वाने गमावल्याने फडणवीसांनी त्यांची उमेदवारी हिरावून घेऊनही त्यांनी लाचारी सोडली नाही. आपल्याला उमेदवारी मिळत नाही, असं पाहून त्यांनी आपल्या पत्नीचं नाव रेटण्याचा प्रयत्न केला. तिथे उमेदवारी भरली, पण एबी फॉर्म नाकारल्याने ते तोंडघशी पडले. स्वत:च्या पाठीमागे यशस्वी मंत्री असं बिरुद लावणाऱ्या व्यक्तीचा इतका अवमान होत असताना या माणसाने लाचारी सोडली नाही. विरोधकांना घराणेशाहीचे दाखले देणाऱ्या बावनकुळेंनी आपल्या कुटुंबाचीही सोय करून ठेवली हे विशेष.
मंत्री असताना या माणसाने खात्याला इतक्या ‘उंची'वर नेऊन ठेवलं की त्यांच्या खात्याच्या कामाशिवाय भानगडींचीच चर्चा जास्त होत होती. सतराशे पन्नास भानगडींनी त्यांचं कार्यालय तेव्हा नावजलं होतं. नागपूरच्या कोण्या कथित महिला पत्रकाराची सततची उठबस हा तर त्यांच्या कार्यालयातला आणि मंत्रालय प्रेसरूमचा चर्चेचा विषय बनला होता. सुरज तातोडे या बावनकुळेंच्याच नातेवाईकाने केलेल्या आरोपाने त्यांचा गड तेव्हा हादरून गेला होता. सतीश उके यांनी हे प्रकरण न्यायालयात पोहोचवल्याने तर अडचणींचा भला मोठा पहाड बावनकुळ्यांपुढे निर्माण झाला होता. उकेंनी बावनकुळ्यांबरोबर फडणवीसांनाही खेचल्याने ते वाचले. पुढे याच तातोडेला त्यांच्या सख्ख्या भावांकरवी खोटं ठरवत या मंडळींनी आपली पापं लपवण्याचे उद्योग पार पाडले. सुरजने केलेले आरोप इतके गंभीर होते की सामान्य माणून या आरोपांनंतर पुरता कोलमडला असता. पण त्यांना या आरोपांचं काहीच वाटलं नाही. मंत्री असतानाच्या अर्थपुर्ण उलाढाली, ठेकेदारांची उठबस आणि त्यांच्या संपत्तीचा भांडाफोड तातोडेने केल्यानंतरही त्यांना फडणवीसांच्या कृपाशीर्वादाने राज्याचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं आणि त्यांना आभाळ ठेंगणं झालं.
प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाचं काय करावं, हा त्यांचा आणि पक्ष नेते, कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. त्यात इतरांच्या ढवळाढवळीचा प्रश्न नाही. पण जेव्हा अशी जबाबदारी येते तेव्हा आपल्या कृतीने किंवा वक्तव्याने पक्षाच्या इभ्रतीला धक्का पोहचणार नाही एवढी माफक अपेक्षा त्या व्यक्तीकडून असते. अध्यक्ष झाल्यानंतर ती दक्षता बावनकुळ्यांनी घ्यायला हवी होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना आपल्या जिभेला हाड नाही, याची जाणीव त्यांनी अनेकदा महाराष्ट्राला करून दिली. प्रदेशाध्यक्ष झालो म्हणून आपण काहीही, कसंही बरळायला मोकळे, असं त्यांना वाटत असेल तर ते मुर्खांच्या कळपात आहेत, असाच अर्थ निघतो. भाजपने आजवर दिलेले प्रदेशाध्यक्ष हे महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणातले आदर्श होते. सुर्यभान वहाडणे, गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या शुचिर्भूत प्रदेशाध्यक्षांच्या पंक्तीत बसण्याचा मान बावनकुळ्यांसारख्यांना मिळणं खरं तर नशिबच होतं. याचा फायदा घेण्याऐवजी शेलक्या शब्दात विरोधकांवर टीका करणं, त्यांची निर्भत्सना करणं असले उद्योग करत त्यांनी या पदाची रया घालवली.
भाजप सध्या संकटाच्या अनेक वादळांना सामोरे जात आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून तर पक्षाला सातत्याने पराभवाचे सामने करावे लागत आहेत. याआधी मुंबईत अंधेरीच्या जागेवर शिवसेनेला धक्का देण्याच्या नादात बावनकुळ्यांनी स्वत:चाही विश्वास गमावला. पुण्यातील कसबा पेठेच्या परंपरेच्या जागेवर कधी नव्हे तो पराभव पत्करावा लागला. हक्काच्या विधानपरिषदेच्या जागांवरील पराभवाने त्यांच्या कतृत्वावर आणि नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं. प्रदेशाध्यक्ष असताना झालेल्या पराभवापासून बोध घेऊन स्वत:ला जोखायला हवं. 48 पैकी 45 जागा जिंकण्याची घोषणा त्यांनी केली. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी पत्रकारांना सांभाळण्याचा अनाहूत सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यासाठी त्यांना धाब्यावर नेवून काळा किंवा दुधाचा चहा द्यावा असे सूचवले. धाबा संस्कृती ही सर्वसाधारणपणे महामार्गांवर असते. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी धाबासंस्कृतीचा नवीन मार्ग तर निवडला नाही ना अशी शंका येते. कारण जो माणूस त्या संस्कृतीचा भाग असतो त्यालाच त्यातील गमजा माहिती असतात. सध्या देशात मिडीयाचे अतिशय वाईट दिवस सुरू असून काही पत्रकारांच्या कतृत्वामुळे त्याला गोदी मिडीया म्हणून हिणवले जात आहे. महाराष्ट्राने यात मागे राहावे हे बावनकुळ्यांना पटणारे नसल्याने धाबा संस्कृतीचा गाढा अभ्यास असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हा मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला. विरोधकांच्या ‘इंडिया' आघाडीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून शिंदेंपासून पवारांपर्यंतच्या विरोधकांना खेचूनही सत्तेचा मार्ग दिसत नसल्याने त्यांनी हा धावा केला असावा. बावनकुळे आणि त्यांच्या नेत्यांना सगळेच पत्रकार म्हणजे भाट वाटत असावेत. आतापर्यंत ठरलेल्या वाहिन्यांच्या पत्रकारांकडून आपल्याला हवे असलेले प्रश्न विचारून घेतले की आपलं काम फत्ते, ही त्यांची धारणा आता यशस्वी होत नसल्याने सगळ्यांनाच धाबेकरी करा, असा तोंडी फतवा त्यांनी काढला असावा. धाब्यावरच्या प्रदेशाध्यक्षाकडून आणखी कसल्या अपेक्षा करणार? साऱ्या राज्यभर इभ्रत गेली तरी खोटं बोलण्याचे उद्योग भाजपचे नेते सोडत नाहीत. त्यांच्या या वकत्व्यावर सर्व स्तरावर टिका झाल्यावर तो मी नव्हेच असं खुलासा ते करु लागले आहेत. खरंतर बावनकुळे यांना जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. परंतु, ही संधी त्यांच्या कतृत्वामुळे न मिळता त्यांच्या भाटगिरीमुळे मिळाली त्यामुळे त्यांनी ना पदाची गरिमा ठेवली ना स्वतःच्या प्रतिमेची. खरंतर अशा खुळ्या प्रदेशाध्यक्षाला फडणवीस यांनी तत्काळ नारळ देणे गरजेचे होते, परंतु ते सर्वानाच क्लिनचिट देत असल्याने अशा नरा पैजारा मारण्याची जबाबदारी आता कोणाची ते जनताच ठरवेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai