Breaking News
मुंबई ः मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थागित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे सिनेट निवडणुकीसाठी दोन दिवसांनी म्हणजेच 22 सप्टेंबरला मतदान होणार होते.
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध अशी थेट लढत होणार होती. पण अचानक या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. दोन दिवसावर मतदान आले असताना अचानक सिनेट निवडणूक स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
“महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 28(2) (न) 28(2) () प्रमाणे (10) नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणूकीची निवडणूक अधिसूचना 3 आगस्ट, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी होती”, असं पत्रकात सुरुवातीला म्हटलं आहे.
“उपरोक्त निवडणुकीच्या अनुषंघाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासना कडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. याबाबतची नोंद सबंधित मतदारांनी, उमेदवारांनी, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गानी घ्यावी ही विनंती”, असं पत्रकात म्हटलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai