नवी मुंबई पालिकेचा दोन स्कॉच पुरस्कारांनी सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 02, 2025
- 343
जलव्यवस्थापन प्रणाली आणि कॅन्सर विषयक काळजी यांचा देशपातळीवर गौरव
नवी मुंबई ः महापालिकेची ‘कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ आणि ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ अशा दोन्ही प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल नवी मुंबई महापालिकेस देशातील प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्काराने नवी दिल्ली येथील ‘स्कॉच समीट’च्या 100 व्या विशेष समारंभात सन्मानीत करण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे सचिव अजय सेठ व स्कॉच समुहाचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्कॉच समुहाचे संचालक डॉ.दीपक फाटक व उपाध्यक्ष डॉ.गुरशरण धंजल यांच्या हस्ते हे ‘राष्ट्रीय मानाचे दोन स्कॉच’ पुरस्कार स्विकारले. याप्रसंगी आयुक्त यांचेसमवेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे उपस्थित होते. भारताला एक उत्तम आणि समर्थ राष्ट्र बनविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या व्यक्ती, संस्थांना ‘स्कॉच’ पुरस्कार प्रदान करून राष्ट्रीय पातळीवर सन्मानीत करण्यात येते. काटेकोर मूल्यमापनातून नवी मुंबई महापालिकेचे ‘कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ आणि ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ हे दोन प्रकल्प मानाच्या ‘स्कॉच’ अंतिम पुरस्कारास पात्र ठरले आहेत. पालिकेच्या वतीने यामधील पहिला ‘कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्राप्त ‘स्कॉच’ पुरस्कार स्विकारताना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई हे सुनियोजित शहर असल्याची माहिती देत जलव्यवस्थापनाचे सुयोग्य नियोजन करण्यावर भर देत असल्याचे सांगितले. शहरात 85 टक्के मीटर कनेक्शन असून पाण्याच्या सुयोग्य वापरावर काटेकोर लक्ष दिले जात आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी आधुनिक मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याच्या वापरावर भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अत्याधुनिक टर्शिअरी ट्रिटमेट प्लान्टमधील 50 द.ल.लि. पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुहांना देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
यासोबतच आरोग्य सुविधांमध्ये विशेष अशी सध्याच्या काळात अत्यंत गरजेची अशी ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ यशस्वीपणे राबवित असल्याबद्दल आणखी एक ‘स्कॉच’ पुरस्कार स्विकारताना आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सद्यस्थितीत कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विशेषत्वाने महिलांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी हा प्रकल्प महापालिकेने सुरू केला असल्याचे सांगितले. यासाठी पालिकेच्या स्थानिक पातळीवरील सर्व 26 नागरी आरोग्य केंद्रात व रूग्णालयात कॅन्सरविषयक प्राथमिक तपासणी केली जात असून संशयित रूग्ण आढळल्यास त्यांना नामांकित टाटा कॅन्सर रूग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तशा प्रकारचा सामंजस्य करार झालेला असून आत्तापर्यंत 10 हजारहून अधिक महिलांची कॅन्सरविषयक तपासणी करण्यात आली आहे व त्यामधील 5 महिलांमध्ये लक्षणे आढळल्याने पुढील उपचारासाठी टाटा रूग्णालयाकडे संदर्भित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे सर्वसामान्य रूग्ण केमोथेरपी उपचारापासून पैशांअभावी वंचित राहू नये यादृष्टीने महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयात विशेष केमोथेरपी कक्ष सुरू करण्यात आला असल्याचेही आयुक्तांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai