ग्रीन बिल्डींग माध्यमातून शहराच्या हरित विकासाला चालना
- by Aajchi Navi Mumbai
- May 09, 2025
- 322
नवी मुंबई ः आजच्या काळात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्व जाणून हरित इमारत अर्थात ग्रीन बिल्डींग संकल्पना प्रभावीपणे राबविली जावी व यामधून शाश्वत शहरी नियोजनाला प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रीन सिटी ग्रीन बिल्डींग’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आयजीबीसीने विकसित केलेली रेटिंग प्रणाली नागरी शाश्वतेमध्ये सुधारणा करण्याच्या संधींचे मूल्यांकन करते. ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन, नागरिक कल्याण, भूमी वापराचे नियोजन, नागरी वाहतूक, पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन, शहर नियोजनातील नाविन्यपूर्णता अशा विविध बाबींचा समावेश होतो. त्यादृष्टीने या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रीन बिल्डींग संकल्पना विशद करीत त्याचा अंगीकार करण्याच्या दृष्टीने सर्वांगीण माहिती देण्यात आली. नवी मुंबईला जागतिक दर्जाचे शाश्वत शहर बनविण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेच्या माध्यमातून एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. आयजीबीसी या मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या समन्वयातून नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये आयोजित या एक दिवसीय कार्यशाळेप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे तसेच नामांकित वास्तुविशारद तथा आयजीबीसीचे नवी मुंबई अध्यक्ष हितेन सेठी व महानगरपालिकेचे सर्व विभागातील अभियंते आणि वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपआयुक्त शरद पवार यांनी सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यावरणदृष्ट्या विचार करणे व त्याचा विकास कामांमध्ये अंगीकार करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत ‘पर्यावरणदृष्ट्या शाश्वत पायाभूत सुविधा निर्मिती’ हा विषय आजच्या काळात महत्वाचा असल्याचे सांगितले. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करतांना आपल्या पुढच्या पिढीसाठीही काही ठेवायचे आहे याचा विचार करणे आवश्यक असून ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. यादृष्टीने कार्यशाळेतील ज्ञानाचा दैनंदिन कामात अंगिकार करणे गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल याचा बांधकाम सुरु करण्यापासूनच विचार करुन बांधकाम झाल्यानंतरही तेथील व्यक्तींच्या स्वास्थ्य आणि कल्याणाचा विचार करणे हा ग्रीन बिल्डींग संकल्पनेचा पाया असल्याचे मत मांडले. नवी मुंबई महापालिकेची प्रत्येक शाळा ग्रीन बिल्डींग संकल्पनेतून उभारण्याचा निश्चय करुया, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर लहान वयापासूनच ग्रीन बिल्डींग विषयाचे पर्यावरणशील संस्कार होतील असेही ते म्हणाले.
निसर्गाची होणारी हानी टाळण्यासाठी विशेषत्वाने विकास कामे करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांनी सामाजिक बांधिलकी मानून ग्रीन बिल्डींग संकल्पनेनुसार कार्यवाही करण्यासाठी सक्रिय व्हावे असेही आवाहन अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले. आयजीबीसीच्या वतीने या एकदिवशीय कार्यशाळेत असो. कौन्सिलर गाग दास, अस्फिया तैमूर, राजा रेड्डी, विक्रम सिंघा यांनी ग्रीन बिल्डींग विषयक विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai