बरड एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 61
पनवेल ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेत पुणेच्या रंग पंढरी संस्थेच्या बरड एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 12 व्या पर्वातील अटल करंडकवर आपले नाव कोरले. तसेच या वर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्वपूर्ण वर्षानिमित्त गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या दोन रंगकर्मीचा गौरव करण्यात आला.
पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण आणि सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या वर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अटल करंडक बहारदार सोहळ्याने अधिक विशेष ठरला. या राज्यस्तरीय स्पर्धेत एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर झाल्याने बहुमानाचा अटल करंडक यंदा कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अखेर या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या ‘बरड’ एकांकिकाचे नाव जाहीर होऊन त्यांना अटल करंडक विजेता बहुमान मिळाला. या महाअंतिम फेरीचे परीक्षण रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मान्यवर कलाकार म्हणून ओळखले जाणारे आणि सशक्त अभिनयशैली, दमदार आवाज आणि भावपूर्ण मुखअभिनय यामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक तसेच मराठी टीव्ही आणि रंगभूमीवरील अभिनेत्री व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अनुभवी अभिनेते सुनील तावडे यांनी केले. स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर आणि स्पर्धेचे स्वतःचे शीर्षक गीत असलेली हि महाराष्ट्रातील एकमेव एकांकिका स्पर्धा असून यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते सुव्रत जोशी होते. या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप तर मिडिया प्रायोजक सन मराठी आणि टीआरपी मराठी हे सोशल मीडिया प्रायोजक होते. हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्यासह टीम अटल करंडक आणि सीकेटी कॉलेज आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेला नाट्य संस्था, कलाकार आणि युवा आणि ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. भव्य दिव्य सिने नाट्य सोहळ्याला साजेसा असा अद्भुत आणि डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा रंगला होता. दुपारी तीन वाजल्यापासून रसिक प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. सोहळा हाऊस फुल झाल्याने अखेर प्रेक्षक मिळेल त्या जागी बसून तर काहींनी उभे राहून पण शिस्तीने या सोहळ्याचा आनंद लुटला. राज्यातील सर्वात मोठी व नावाजलेल्या या स्पर्धेने सर्वाना भारावून टाकले होते. आणखी विशेष म्हणजे, प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी त्यांच्या खास विनोदी आणि प्रभावी शैलीत बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला अनोखी रंगत आणली. महाअंतिम फेरीत तब्बल 25 एकांकिकाचे परिक्षण करताना आणि त्या बघताना खूप उत्सुकता होती. रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या दोन्ही मान्यवरांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी 50 हजार रुपये असे होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai