गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 22
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; मंडप परवानग्या जलद देण्याच्या सूचना
मुंबई : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात गणेश मंडळांकडून भाविकांना देण्यात येणारा प्रसाद शुद्ध आणि भेसळमुक्त असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रसाद तयार करताना आवश्यक किमान निकषांची पूर्तता करण्यासाठी गणेश मंडळांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गणेशोत्सव-2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार पुढे नेणे आवश्यक आहे. राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे गणेशोत्सवाची परंपरा, शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रशासनासह गणेश मंडळे, विविध संघटना आणि नागरिकांची आहे. गणेशोत्सव उत्साहपूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
जुन्या मंडळांच्या परवानग्या जलद द्या
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांत संरचित व्यवस्था निर्माण झाली आहे. मात्र, दरवर्षी निर्माण होणाऱ्या नव्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्या प्रलंबित राहू नयेत. जुन्या मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवावेत. या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत तसेच रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था असेल, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बृहन्मुंबई महापालिका अधिनियमातील कलम 143 नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांना मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. यासाठी संबंधित मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
फटाके, लाऊडस्पीकरवर पोलिसांची नजर
गणेशोत्सवात फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापराबाबत नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांची पुन्हा पडताळणी करावी. विशेषतः मोठ्या मूर्ती असलेल्या मंडळांना आवश्यक सूचना देऊन सर्व व्यवस्था सुरक्षित असल्याची खात्री करावी. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली .पीओपीच्या मूर्तींचे नदी अथवा समुद्रात विसर्जन होऊन प्रदूषण होणार नाही, यासाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती शासनाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी नियोजन केले असून, गणेश मंडळांच्या सूचनांचाही त्यात समावेश करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईतील सुमारे 1 हजार 850 किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवरील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, असे निर्देश देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांना किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.मोठ्या मूर्तींची वाहतूक करताना मूर्तीची रचना, नट-बोल्ट, वेल्डिंग तसेच इतर जोडण्या सुरक्षित असल्याची खात्री करावी. आगमन आणि विसर्जनावेळी लहान मुले तसेच भाविकांना मूर्तीपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच मंत्रालय, मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai