उद्यान घोटाळ्यावर आयुक्तांचा नांगर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 06, 2020
- 678
16 अधिकारी व 2 ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस
नवी मुंबई ः उद्यान विभागात काम न करता ठेकेदाराला 8 कोटी रुपये अदा केल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला होता. या आरोपाची दखल घेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी कार्यकारी अभियंता मनोज पाटील यांच्याकडून याबाबत चौकशी अहवाल मागितला होता. प्राप्त झालेल्या अहवालावरुन बांगर यांनी 16 अधिकारी व ठेकेदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आमदार म्हात्रे यांनी आयुक्तांच्या या कारवाईचे स्वागत केले असून या घोटाळ्यातील नायकांना उघडे करण्याचे आवाहन आयुक्तांना केले आहे.
महापालिकेने मार्चमध्ये परिमंडळ 1 आणि 2 मधील उद्यान देखभाल दुरुस्तीचे 34 कोटींचे एकत्रित कंत्राट दोन ठेकेदारांना विभागून दिले होते. यापुर्वी ही कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांकडून करण्यात येत होती. एकाच ठेकेदारामार्फत काम केल्यास त्याची जबाबदारी निश्चित करता येते म्हणून यावेळी उद्यान विभागाने एकत्रित काम काढले होते. संबंधित ठेकेदारांना एप्रिल, मे आणि जून या काळातील तीन महिन्यांचे सूमारे 8 कोटी रुपये पालिकेकडून अदा करण्यात आले. या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन असताना एवढे मोठे देयक कसे अदा केले याबाबतची विचारणा आ. म्हात्रे यांनी करुन चौकशीची मागणी आयुक्त बांगर यांच्याकडे केली होती. आयुक्त बांगर यांनी या आरोपांची दखल घेत दोन कार्यकारी अभियंतामार्फत कामाची व देयकांची चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कार्यकारी अभियंता मनोज पाटील यांनी आपला अहवाल अतिरिक्त आयुक्त राजेश काकडे यांच्याकडे सादर केला. या अहवालात कंत्राटदारांनी उद्यानात न केलेल्या कामांची लाखो रुपयांची देयके उद्यान विभागाने दिल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर सीएसआर फंडातून केलेली कामे ही कंत्राटदारांच्या नावावर दाखवून पालिकेच्या तिजोरीची सफाई केल्याचे निष्पन्न झाले आहे. या व अशा अनेक बाबी आपल्या अहवालात पालिका अधिकार्यांनी सादर केल्याने संबंधित विभागातील अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, आयुक्तांनी या विभागातील 16 अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून लवकरच संबंधितावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्यान विभागाने ठेकेदाराला काम न करता अदा केलेले देयक यामागे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. पालिका आयुक्तांनी संबंधित देयकावर लेखापरिक्षण अहवाल मागवून गुन्हा दाखल केल्यास या जनतेच्या पैशावर डल्ला मारणार्यांचे खरे रूप उघडे होईल.
- मंदा म्हात्रे, आमदार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai