कापड कचऱ्याचे ‘संपत्तीत’ रूपांतर
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 22
नवी मुंबईतील वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांकडून कौतुक
नवी मुंबईतील यशस्वी मॉडेल देशभर राबविण्याचा केंद्राचा मानस; महिलांना रोजगारासह पर्यावरण संवर्धनाला चालना
नवी मुंबई : कापडाचा कचरा केवळ टाकाऊ वस्तू न मानता त्याचे पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून त्याला आर्थिक मूल्य देण्याचा अभिनव प्रयोग नवी मुंबईत यशस्वी ठरला आहे. सीबीडी बेलापूर येथे नवी मुंबई महानगरपालिका आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्र समितीच्या सहयोगाने सुरू असलेल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची केंद्रीय वस्त्र मंत्री गिरीराज सिंह यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. नवी मुंबईत यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे मॉडेल देशातील इतर शहरांमध्येही राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कापडी कचऱ्याला कचरा न समजता त्याकडे ‘संपत्ती’ म्हणून पाहण्याची गरज आहे. कापड टाकून देण्याऐवजी त्याचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया केल्यास शहराच्या स्वच्छतेला हातभार लागतो. त्याचबरोबर अपसायकलिंग, रिसायकलिंग आणि सर्क्युलर इकॉनॉमीला चालना मिळते. नवी मुंबईतील हा प्रकल्प या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नमूद केले.या प्रकल्पात नागरिकांकडून वापरून झालेले आणि टाकून देण्यात येणारे कपडे संकलित केले जातात. त्यासाठी विविध सोसायट्यांमध्ये विशेष कचरापेट्या ठेवण्यात आल्या असून, सुस्थितीतील टाकाऊ कपडे संकलित करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे वाहन सोसायट्यांमध्ये जाऊन तसेच नवी मुंबईतील 92 थ्री-आर सेंटरमधून कपडे संकलित करून पुनर्प्रक्रिया केंद्रात आणते.केंद्रात दाखल झालेल्या जुन्या कपड्यांचे त्यांच्या स्थितीनुसार आणि प्रकारानुसार वर्गीकरण केले जाते. वापरण्यायोग्य कपड्यांवर आवश्यक प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर केला जातो, तर पुनर्प्रक्रियायोग्य वस्त्रांपासून विविध आकर्षक आणि उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात. या प्रक्रियेला अपसायकलिंग म्हणतात. त्यामुळे एकीकडे क्षेपणभूमीवर जाणाऱ्या कापडी कचऱ्याचे प्रमाण कमी होते, तर दुसरीकडे टाकाऊ कपड्यांपासून नव्या उत्पादनांची निर्मिती होते. या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरणाला मिळणारी चालना. नवी मुंबई महानगरपालिका, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाऊंडेशन आणि टिसर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिला बचत गटांमधील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कापड वर्गीकरण, पुनर्निर्मिती आणि विविध वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग असल्याने पर्यावरण संवर्धनासोबतच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही हातभार लागत आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन या तीनही आघाड्यांवर हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
नवी मुंबईत अशा प्रकारच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, त्याला मिळालेले यश लक्षात घेता देशातील इतर शहरांमध्येही हे मॉडेल राबविण्याचा केंद्राचा मानस असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. शहर स्वच्छतेच्या प्रयत्नांना अशा प्रकल्पांमुळे नवी दिशा मिळू शकते. कापड कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि पुनर्वापरासाठी देशभर अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कापड कचरा कमी करणे, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर वाढवणे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, या त्रिसूत्रीवर आधारित नवी मुंबईचा हा प्रकल्प भविष्यात शाश्वत कचरा व्यवस्थापनाचे देशातील एक प्रभावी मॉडेल ठरण्याची शक्यता आहे.
- थ्रिफ्ट स्टोअरचे उद्घाटन
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते यावेळी टीआरएफ सेंटरमधील पुनर्निर्मित वस्तूंच्या विक्रीसाठी थ्रिफ्ट स्टोअर सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. पुनर्प्रक्रिया केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे पुनर्निर्मित वस्तूंचा वापर वाढण्यासोबतच सर्क्युलर इकॉनॉमीच्या संकल्पनेलाही चालना मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai