करुया ‘संवर्धन’ गडकिल्ल्यांचे

नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर ‘संवर्धन’ हा मराठी लघुपट युट्यूबवर प्रदर्शित करुन गडकिल्ले वाचविण्याचा मोलाचा संदेश जेजेएनएस क्रिएशन्सने दिला आहे. हा लघुपट गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे यावर आधारित आहे. या लघुपटाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा पण महाराजांच्या जयंतीसाठी गोळा केलेल्या निधीचा वापर त्यांच्या गडकिल्ल्याच्या डागडुजी करण्यासाठी, साफसफाई आणि सुशोभीकरणासाठी करा असा संदेश दिला आहे. लेखकाने अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गडकिल्ल्यावर जाऊन दारूच्या पार्ट्या करणे, प्रेमीकांनी चित्रविचित्र काढलेली चित्रे आणि तेथील खडकांवर मजकूर लिहिणे, तोफा तसेच तेथील वस्तूवर पाय ठेऊन फोटो काढणे, भटकंतीसाठी गेल्यावर तेथे कचरा टाकून अस्वच्छता करणे यावर बंदी घालावी अस भाष्य या लघुपटाच्या माध्यमातून केलं आहे. गडकिल्ले ही आपली संस्कृती आहे. त्याच्यासाठी हजारो मावळ्यांचे रक्त सांडले आहे. या ऐतिहासिक वास्तू आता जपल्या, त्यांचे संवर्धन केले तरच येणार्‍या पुढच्या पिढ्यांना इतिहासाची खरी ओळख होईल. चला तर मग सगळे एकत्र येऊयात आणि गडकिल्ले वाचवण्यासाठी तेथे साफसफाई आणि सुशोभीकरणासाठी हातभार लावूयात असे आवाहन जेजेएनएस क्रिएशन्सने समाजाला केले आहे. लवकरच जेजेएनएस क्रिएशन्सचे सदस्य आणि ‘संवर्धन’ लघुपटातील कलाकार स्वतःपासून सुरुवात करुन एका गडकिल्ल्यावर साफसफाईची मोहिम राबविणार आहेत. 

 यातील सर्व कलाकारांनी खूप आत्मिकतेने काम केलं आहे. तसेच संवर्धन या लघुपटाची निर्मिती साई किरण ऍग्रो पोल्ट्री फार्मचे मालक अनंत माळगावकर यांनी केली आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद शांताराम मेस्त्री यांनी केले असून कलादिग्दर्शन गौरव शशिकांत साटम आणि आदित्य सहदेव धोपट यांनी केले आहे. छायाचित्रण चैतन्य होले यांनी केले आहे. याचे संकलन रितेश परब यांनी तर रंगभूषा आणि वेशभूषा तेजस्वी रामचंद्र निगवेकर आणि अमृता पांडुरंग कोकणे यांनी केले आहे. याचे प्रोडक्शन प्रतिक ठोंबरे आणि किरण घरत यांनी सांभाळले आहे. 

कलाकार ः जीवन चव्हाण, किरण घरत, तेजस्वी निगवेकर, शुभांगी देठे, अमृता कोकणे, अभिषेक कुलकर्णी, गौरव साटम, आकांशा रोडे, विजय कोयंडे, अमोल पवार, महेश आंबेरकर, प्रतिक ठोंबरे, आदित्य धोपट, राहुल कांबळे , गौरी नाईक

बालकलाकार ः अस्मी गायकवाड, अर्पित अहिरे