BS4 इंजिनच्या गाड्या विकणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बनावट कागदपत्रांद्वारे विकलेल्या 151 गाड्या जप्त

नवी मुंबई : BS4 गाड्यांची विक्री करण्यास मार्च 2020 पासून सरकारने बंदी केली होती. यामुळे स्टॉकमध्ये असलेल्या 406 नवीन गाड्या मारूती सुझुकी कंपनीने स्क्रॅपमध्ये विकल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात गाड्या भंगारात न काढता आरोपींनी बनावट चेसी नंबर, कागदपत्र, नंबर प्लेट तयार करून देशांतील विविध राज्यांत विकून टाकल्या होत्या. यातील 151 गाड्या जप्त करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आलं आहे. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे भारत सरकारने BS4 इंजिन गाड्यांवर मार्च 2020 पासून विकण्यास बंदी केली होती. यानंतर स्टॉकमधील असलेल्या नवीन 406 गाड्या मारूती सुझुकी कंपनीने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून भंगारमध्ये विकल्या होत्या. भंगारात विकलेल्या गाड्या मुख्य आरोपी आनम सिध्दीकी याने प्रत्यक्षात तोडून न टाकता परत विक्रीस काढल्या. पनवेल मधील पुरात भिजलेल्या गाड्या असल्याचे दाखवत आरोपींनी कमी किंमतीत BS4 इंजिन असलेल्या गाड्या संपूर्ण भारतात विकल्या. यासाठी बनावट चेसी नंबर, इंजिन नंबर , कागदपत्र , गाडी नंबर तयार करून त्या सर्वसामान्यांच्या गळ्यात मारल्या. स्वस्तात गाड्या मिळत असल्याने अनेक लोकांनी लाखो रूपये देवून घेतलेल्या गाड्या भंगारात निघाल्या असल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही.  महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, हिमाचल आधी राज्यांत या गाड्या विकण्यात आल्या होत्या. 406 गाड्यांपैकी 14 कोटी रूपयांच्या 151 गाड्या जप्त करण्यात नवी मुंबई क्राईम ब्रान्चला यश आलं असून या प्रकरणी 9 जणांच्या टोळीला अटक करण्यास आलं आहे.

दिल्ली परिसरात विकलेल्या 300 गाड्या नवी मुंबई क्राईम ब्रान्चच्या हाती लागलेल्या आहेत. मात्र त्या गाड्या महाराष्ट्रामध्ये आणायच्या कशा? हा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला आहे. दिल्लीतून 300 गाड्या नवी मुंबईत आणण्यास लाखो रूपयांचा खर्च आहे. त्यामुळे संबंधित गाड्या त्याच ठिकाणी जप्त करून ठेवल्या असल्याचे पोलीस यंत्रणेने सांगितले आहे.

कशा विकल्या गाड्या?

पनवेलच्या शिरढोण येथील बालाजी लॉजमधून देशभरात गाड्या विक्रीचे रॅकेट चालवले जात होते. खरेदी केलेल्या गाड्या बालाजी लॉजच्या आवारात ठेवून तिथल्या सहा खोल्या दीर्घकाळासाठी भाड्याने घेतल्या. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून त्याठिकाणी तो आपल्या सहकार्‍यांसह मुक्कामी होता. यामुळे लॉजचालकही पोलिसांच्या रडारवर आला आहे. मारुती कंपनीने गाड्या भंगारात काढताना त्यावरील चेसी नंबरचा भाग कापला होता. मात्र आनमने गुजरातमधील हिम्मतनगर येथील गॅरेजचालक इमरान चोपडाशी संपर्क साधून औरंगाबाद येथून गाड्यांचे चेसी नंबर छापणारी सव्वा लाखाची मशीन खरेदी केली. ती इमरानच्या गॅरेजवर ठेवून तिथे पाहिजे असलेल्या गाडीची चेसी नंबर छापून पनवेलला पाठवली जायची. त्यानंतर गाडीची बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित ठिकाणच्या आरटीओमध्ये नोंदणी करून दिली जात होती. आनमने गाड्या विक्रीसाठी एजंट नेमले होते. त्यांना सव्वा ते दीड कोटीला 40 गाड्यांचा संच विक्रीसाठी देण्यात आला होता. त्यानुसार अधिकाधिक नफा कमाविण्याच्या उद्देशाने गाड्यांची किंमत ठरवून त्या विकण्यात आल्या होत्या. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने 28 जानेवारीला पनवेल येथे छापा टाकण्यापूर्वी काही दिवस अगोदर तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. त्यानंतर कारवाईपासून ते अद्यापपर्यंत या गुन्ह्यात नऊ जणांना अटक करून देशभरातून 151 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, तर अद्यापही 100हून अधिक गाड्या पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.