महाराष्ट्र भवनसाठी अर्थसंकल्पात तरतूद

नवी मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी  वाशी नवी मुंबई येथे भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त अशी महाराष्ट्र भवन वास्तूच्या निर्माणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर जाहीर घोषणा केली. महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी रु. 26 कोटी 32 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली असून सदर वास्तूच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधीचीही तरतुद करण्यात येणार आहे. 

नवी मुंबई शहर उभारताना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. महाराष्ट्र भवन उभारणेकरिताही सिडकोने 8000 स्क़्वे.मी. चा भूखंड आरक्षित केला आहे. परंतु 1998 पासून आजपर्यंत सदर भूखंडावर महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी एक वीटही रचण्यात आलेली नाही. कोंकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणांहून नागरिक कामांसाठी मुंबई येथे येत असतात. त्याकरिता मुंबईच्या जवळपास सदर भवनाची निर्मिती होणे गरजेचे आहे. कोविडसारख्या आपत्तीकाळात याचा जास्त उणीवा जाणवल्या. सदर निधीची तरतूद करून दिल्याने नवी मुंबईत सुसज्ज व भव्य अशी महाराष्ट्र भवनची वास्तू निर्माण होणार आहे. या महाराष्ट्र भवनसाठी बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इतर संघटना यांनी पाठपुरावा केला होता तसेच भवन उभारण्याकरिता चालू अर्थसंकल्पीय वर्षात निधीची तरतूद करण्यात यावी, याकरिता आ. मंदा म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.