आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 17
नवी मुंबई ः आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या सहकार्याने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित योगविषयक विशेष कार्यक्रमात विविध वयोगटातील 5 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत ‘स्वच्छतेतून आरोग्य व आरोग्यासाठी योग’ असा संदेश व्यापक स्वरूपात प्रसारित केला.
मानसिक शांती व शारीरिक क्षमतावृध्दी करणाऱ्या योगाचे महत्व केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील विविध देशांमधल्या लोकांना समजले असल्याचे सांगत वन मंत्री गणेश नाईक यांनी केवळ आजच्या योग दिनापुरते नाही तर वर्षाचे 365 दिवस योगासनांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले आरोग्य जपावे असे आवाहन केले. माणसाचे मन शुध्द व संतुलित करणाऱ्या आणि संयमाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या योगाचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या माध्यमातून जगभरात वृध्दींगत केले असे ते म्हणाले. योगाव्दारे मनाची व शरीराची निगा राखण्याप्रमाणेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचीही गरज त्यांनी विशद केली. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आदीनाथ शंकरांपासून योगविद्येची सुरूवात झाली असा उमगाचा उल्लेख करीत ऋषीमुनींपासून पुढे चालत आलेले हे योग ज्ञान आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले. योग म्हणजे केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर ती तनामनाची शुध्दी करणारी नियमित आचरणात आणावी अशी गोष्ट असल्याचे सांगत महापौर महोदयांनी योगाचे महत्व विशद केले.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी बोलताना पंतप्रधान महोदयांच्या प्रेरणेतून मागील 12 वर्षांपासून नवी मुंबईत सातत्याने योगविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मन:शांती, प्रकृती स्वास्थ्य यांची योगाद्वारे जपणूक होतेच, शिवाय योगाच्या दैनंदिन आचरणामुळे आपण थकलेले वृध्द होत नाही तर मनाने नेहमी तरूण राहतो अशीही वस्तुस्थिती त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे वनमंत्री, महापौर, आमदार, आयुक्त व उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसह योगक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.
द ऑर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक प्रमोद कोकणे व दिप्ती देशपांडे यांनी सहजसाध्या पध्दतीने योगक्रिया करून घेतल्या तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या शिलादिदी यांनी मन:शांतीची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे वृक्षरोपांच्या कुंड्या व योगविषयक ग्रंथभेट देऊन पर्यावरणस्नेही स्वागत करण्यात आले. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन ‘निरोगी वृध्दत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित जगभरात साजरा करण्यात येत असून देशातील सुपर स्वच्छ शहर असा नावलौकिक असणाऱ्या नवी मुंबईने स्वच्छता, आरोग्य आणि योग या त्रिसूत्रीचे महत्व अधोरेखित करीत विशेषत्वाने विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील आरोग्यप्रेमी नागरिकांना एकत्र आणत अत्यंत उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai