आरोग्य स्वराज्य उभारणे ही प्रत्येकाची जबाबदारी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 25
पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : भारतीय समाजव्यवस्थेला पूरक अशी आरोग्यव्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. केवळ दीर्घायुष्य नव्हे, तर निरोगी, आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत. आरोग्य ही केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आरोग्य स्वराज्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून व्हायला हवी’ असा प्रेरणादायी संदेश पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला.
प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या वतीने मराठी साहित्य मंदिर, वाशी येथे आयोजित शिक्षण, साहित्य, आरोग्य आणि समाजसेवेचा प्रेरणादायी संगम ठरलेला विशेष कार्यक्रम उत्साहात व दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभात ट्रस्ट आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “आता थांबायचं नाय” या उपक्रमातून अनेक वर्षांपूर्वी शिक्षण अर्धवट सोडलेल्या कचरा वेचक महिलांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरत दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीमध्ये प्रवेश मिळविल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. आनंदी कांबळे (65.20%), प्रतीक्षा कीरतकुढवे (62.00%) आणि चंदा पटेकर (58.20%) यांच्यासह सोनाली कांबळे, मंगल कांबळे, सुनंदा पाठनुरे, अक्षदा गायकवाड, हेमा कांबळे, मुक्ता राठोड, रमा बगाडे आणि संगीता आसवले या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या यशामागे निःस्वार्थ भावनेने ज्ञानदान करणाऱ्या प्रशांत गाडेकर, सुनिता गाडेकर, सचिन आमडोस्कर, मंगला आमडोस्कर, अजित खताळ, अरुणा खताळ, मधुकर वारभुवन, शांताबाई वारभुवन, आशा गायकवाड, जयाबाई गायकवाड, अशोक गालवे, शेवंताबाई गालवे, आशा भानुगडे, सुनंदा भानुगडे, निशा राठोड आणि सगुणा राठोड या शिक्षकांचा सुवर्ण मुद्रा प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या ‘साक्षात्कारी हृदयरोग’, ‘जीवनाचे काय करू?’ आणि ‘आरोग्य स्वराज्य’ या स्वलिखित पुस्तकांची ग्रंथतुला. या उपक्रमातून प्राप्त झालेली पुस्तके विविध ग्रंथालयांना भेट देण्यात येणार असून, ज्ञानाचा प्रसार करण्याचा हा अभिनव उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.
याच कार्यक्रमात रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वाटवाणी यांच्या निराधार मनोरुग्णांच्या उपचार, पुनर्वसन आणि कुटुंबाशी पुनर्मिलनाच्या मानवतावादी कार्यावर आधारित “रस्त्यावरचे निराधार मनोरुग्ण“ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai