नैना प्रकल्पाला गती
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 62
गावनिहाय शेतकरी समन्वयावर सिडकोचा भर
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातील (नैना) प्रकल्पातील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी सिडकोने गावनिहाय शेतकरी समन्वय सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या हरकती, रस्त्यांच्या आराखड्यातील बदल, भूमापन, लवादातील प्रकरणे आणि मालमत्ता पत्रकांच्या प्रक्रियेचा आढावा घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील काही महिन्यांत प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नैना प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 27 जुलै रोजी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पनवेल आणि उरणमधील लोकप्रतिनिधींनी काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या राहत्या घरांवर अंतिम भूखंड तसेच रस्ते दर्शविल्याने निर्माण झालेल्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सिडकोला शेतकऱ्यांशी थेट समन्वय साधून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर सिडकोने पहिल्या टप्प्यात नगररचना प्रकल्प (टीपीएस) क्रमांक 2, 4, 7 आणि 11 वर लक्ष केंद्रित केले आहे. टीपीएस क्रमांक 7 अंतर्गत देवद, उसल खुर्द, विचुंबे, कोळखेपेठ आणि शिवकर या गावांतील शेतकऱ्यांच्या हरकतींचा आढावा घेतला जात आहे. राहत्या घरांवर अंतिम भूखंड किंवा रस्ते दर्शविलेल्या प्रकरणांमध्ये आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ज्या प्रकरणांमध्ये हरकत अथवा कायदेशीर अडचण नाही, अशा अंतिम भूखंडांचे मालमत्ता पत्रक (प्रॉपट कार्ड) वितरित करण्याची तयारी सिडकोने केली आहे. या मालमत्ता पत्रकांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचेही नियोजन आहे.
- गावनिहाय प्रश्नांचा होणार आढावा
मुद्गल यांनी नैना प्रकल्पाच्या कामाचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. भूमी व भूमापन, लवादातील प्रकरणे, गावनिहाय शेतकऱ्यांच्या हरकती, घरांनुसार रस्त्यांच्या आराखड्यातील बदल, सुरू असलेल्या विकासकामांतील अडचणी तसेच मालमत्ता पत्रकांसाठीची महसुली प्रक्रिया यांचा आढावा घेतला जाणार आहे. मुख्य नियोजनकार आशुतोष उईके, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी समाधान खटकाळे, तेजस समेळ आणि अन्य अधिकारी ही प्रक्रिया राबवत आहेत. सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. - लवादाच्या कार्यपद्धतीवरही लक्ष
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नैना प्रकल्पातील लवादाच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. लवादाकडून विहित कार्यपद्धतीनुसार सुनावणी होत नसल्याचे आढळल्यास विद्यमान लवादाची नियुक्ती रद्द करून नव्याने लवाद नियुक्त करण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या उपसचिवांना देण्यात आले आहेत.दरम्यान, नैना प्रकल्पाचा आराखडा तयार करताना प्रत्यक्ष शेतजमिनीवर जाऊन पाहणी न झाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याचेही बैठकीत समोर आले. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून आराखड्यात आवश्यक बदल करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यावर सिडकोचा भर राहणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai