375 रिक्षाचालकांची तपासणी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 22
मराठी न बोलणाऱ्या 27 जणांना नोटिसा
नवी मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर नवी मुंबईत प्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारपासून तपासणी मोहीम सुरू केली. शहरातील प्रमुख चौक, रेल्वे स्थानके आणि रिक्षांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आरटीओच्या पथकांनी रिक्षा थांबवून चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची प्रत्यक्ष पडताळणी केली. पहिल्याच दिवशी तब्बल 375 रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली असून, मराठीत संवाद साधता न आलेल्या 27 चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या.
वाशी रेल्वे स्थानक परिसरासह नवी मुंबईतील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली. प्रवाशाने मराठीत विचारलेला साधा प्रश्न चालकाला समजतो का आणि त्याला त्याचे उत्तर मराठीत देता येते का, याची प्रत्यक्ष संवादातून तपासणी करण्यात आली. रिक्षा किंवा टॅक्सी चालविण्यासाठी मराठी भाषेचे उच्च पातळीवरील ज्ञान अपेक्षित नसून, प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करता येईल इतके व्यावहारिक ज्ञान आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 19 ऑगस्ट रोजी 20 ऑगस्टपासून राज्यभर या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नवी मुंबईत आरटीओच्या पथकांनी प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात केली आहे. नवीन रिक्षा-टॅक्सीचा बॅज देतानाही चालकाचे मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष संवादातून तपासले जाणार असून, या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये 12 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत सुमारे 1 लाख 65 हजार 600 अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षणाची संधी देऊनही आवश्यक मराठी ज्ञान नसलेल्या चालकांवर आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोळकर यांच्या माहितीनुसार, तपासणीसाठी विविध पथके तयार करण्यात आली असून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोहीम राबविण्यात येत आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांना भाषा शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत त्यांनी मराठीचे ज्ञान आत्मसात करणे अपेक्षित आहे. त्यानंतरही मराठीत संवाद साधता न आल्यास संबंधित चालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगोळकर यांनी स्पष्ट केले.एका दिवसातील कारवाईनेच 27 चालकांना नोटिसा मिळाल्याने पुढील काळात नवी मुंबईतील ही तपासणी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai