इस्कॉनद्वारे जन्माष्टमीचा भव्य सोहळा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 32
महिनाभर आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; 23 ऑगस्टपासून कार्यक्रमांची रेलचेल
नवी मुंबई : खारघर येथील इस्कॉन नवी मुंबईच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी 2026 निमित्त भव्य आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम होणार असून, 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
इस्कॉन नवी मुंबईचे अध्यक्ष डॉ. सुर दास यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. 15 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अल्पावधीतच खारघरमधील हे मंदिर नवी मुंबईतील महत्त्वाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. उत्सवाची सुरुवात 23 ते 28 ऑगस्टदरम्यान झुलन यात्रेने होणार आहे. दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत कीर्तन, भजन आणि विशेष आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 28 ऑगस्ट रोजी बलराम जयंती आणि बलराम पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान श्रावण उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी 7.30 ते रात्री 9 या वेळेत नामवंत वक्त्यांकडून श्रीकृष्ण कथा आणि आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.
4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य उत्सव होणार आहे. यानिमित्त मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुले राहणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता कलश दात्यांसाठी विशेष कलश अभिषेकाला सुरुवात होईल. रात्री 11 वाजता महाअभिषेक, त्यानंतर मध्यरात्री महाआरती, उत्साहपूर्ण कीर्तन आणि प्रसाद वितरण होणार आहे. दाते आणि आजीवन सदस्यांसाठी सदस्यत्व कार्डच्या आधारे विशेष दर्शनासाठी स्वतंत्र प्राधान्य रांगा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 5 सप्टेंबर रोजी इस्कॉनचे संस्थापक-आचार्य श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा 130 वा प्रकटदिन साजरा करण्यात येणार आहे. यानंतर 7 सप्टेंबर रोजी परमपूज्य गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराज यांची व्यासपूजा, तर 19 सप्टेंबर रोजी राधाष्टमी साजरी केली जाणार आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी गर्दीचे नियोजन आणि व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. स्थानिक पोलीस, स्वयंसेवक, आरएसएस स्वयंसेवक, उत्सव समितीचे सदस्य आणि समाजसेवक यांच्या समन्वयातून गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल मित्तल आणि सचिव राजेश तिवारी यांनी याबाबत माहिती दिली. “हा उत्सव केवळ मंदिरातील कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याची, श्रीकृष्ण कथा ऐकण्याची, पवित्र नामांचा जप करण्याची आणि प्रसाद ग्रहण करण्याची संधी आहे. भगवान श्रीकृष्णांच्या अवताराचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि श्री श्री राधा मदनमोहनजींचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांनी कुटुंबीय आणि मित्रांसह सहभागी व्हावे,” असे आवाहन इस्कॉन नवी मुंबई, खारघरचे अध्यक्ष डॉ. सुर दास यांनी केले.
- दीड वर्षात सामाजिक सेवेलाही मोठी गती
मंदिराच्या उद्घाटनानंतर इस्कॉन नवी मुंबईकडून आध्यात्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेने सांगितले. संस्थेच्या माहितीनुसार, आतापर्यंत 80 लाख डोना प्रसाद आणि 2.5 लाख पोटभर जेवणाचे वितरण करण्यात आले आहे. भक्तिवेदांत आयुर्वेदिक उपचार व संशोधन केंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे उपक्रम सुरू करण्यात आले असून, टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या उढठएउ सोबत एकात्मिक रुग्णसेवेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai