प्लास्टिक पुनर्प्रक्रियेतून बनवल्या कचराकुंड्या व बेंचेस
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 23
नवी मुंबई ः महापालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माईंडस्पेस आरईआयटी यांच्या सहयोगाने ‘घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ या अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा आणि ई कचरा पुनर्वापर उपक्रमाच्या अनुषंगाने प्लास्टिक पुनर्प्रक्रियेतून तयार केलेल्या 100 कचराकुंड्या आणि 65 गार्डन बेंचेसचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण नमुंमपा मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि माईंडस्पेस आरईआयटी यांच्या संयुक्त सहभागातून नवी मुंबईत प्लास्टिक संकलन, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियेसोबतच नागरिकांमध्येही पर्यावरणाविषयी जनजागृती केली जात आहे. या उपक्रमांमधून मागील 11 महिन्यात आत्तापर्यंत साधारणत: 9 टन प्लास्टिक संकलित करण्यात आले असून त्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. या उपक्रमात आत्तापर्यंत 53 शाळा, 9 महाविद्यालये, 20 गृहनिर्माण सोसायट्या आणि 10 कार्यालये सक्रिय सहभागी झाली आहेत. प्लास्टिक संकलनात सातत्याने योगदान देणाऱ्या सहभागी संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोजेक्ट मुंबई आणि माईंडस्पेस आरईआयटी यांच्या माध्यमातून संकलित प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून तयार केलेल्या कचराकुंड्या व गार्डन बेंचेस या संस्थाना देण्यात येत आहेत.
या अनुषंगाने उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात प्लास्टिक संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच सातत्याने प्लास्टिक संकलनात योगदान देणाऱ्या सहभागी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी 240 लिटर क्षमतेच्या 100 कचराकुंड्या व प्लास्टिक पुनर्प्रक्रियेतून तयार केलेले 65 गार्डन बेंचेस हे उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या विविध शाळा, गृहनिर्माण संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना देण्यात येत आहेत. त्यानुसार स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून - ग्रीन वर्ल्ड सोसायटी दिघा, ॲग्रो गार्डन बेलापूर, दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय ऐरोली, डीएव्ही पब्लिक स्कुल नेरूळ आणि नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 10 यांना महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेविका नेत्रा शिर्के, व पालिकेतील अधिकारी यांच्या हस्ते काही संस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रोजेक्ट मुंबई संस्थेचे मुख्य प्रकल्प अधिकारी धर्मराज सोलंकी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून कचरा हा टाकाऊ नाही, तर ते एक मौल्यवान संसाधन आहे हा संदेश प्रसारित केला जात आहे. प्लास्टिकचा वापर केल्यानंतर त्याकडे टाकाऊ कचरा म्हणून न पाहता त्याचे संकलन, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करून उपयोगी वस्तूंमध्ये रूपांतर करता येते,हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यश लाभत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai