ठाणे ते विमानतळासाठी सहा पदरी शॉर्टकट
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 16
6 हजार कोटींच्या उन्नत मार्गाची निविदा प्रसिद्ध ; ताशी 100 किमी वेगाने धावणार वाहने, प्रवाशांना टोलचा भुर्दंड
नवी मुंबई : ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित सहा मार्गिकांच्या उन्नत मार्गाच्या प्रकल्पाने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सिडकोने 25.287 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 6 हजार 27 कोटी 58 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या मार्गामुळे ठाणे आणि आसपासच्या शहरांमधून विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. सध्या विमानतळ गाठण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गावर अवलंबून असलेल्या प्रवाशांना पर्यायी मार्ग मिळणार असून प्रवासाच्या वेळेत सुमारे 40 मिनिटांची बचत होण्याचा सिडकोचा अंदाज आहे.
ठाण्यातील कोपरी परिसरातून सुरू होणारा हा उन्नत मार्ग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाणार आहे. या मार्गावरून प्रवास केल्यानंतर ठाणे ते विमानतळ हे अंतर 50 ते 60 मिनिटांत पार करता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मार्गाचा संकल्पित वेग ताशी 100 किलोमीटर ठेवण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असला तरी त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि मीरा-भाईंदर या परिसरातील नागरिकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या ठाणे-बेलापूर मार्ग, शिळफाटा-तळोजा मार्ग तसेच अंबरनाथ-बदलापूरकडून तळोजामार्गे विमानतळाकडे जाण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, वाढती वाहतूक आणि अंतर लक्षात घेता ठाण्यातून थेट विमानतळापर्यंत उन्नत मार्गिका उभारण्याची संकल्पना पुढे आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाच्या आखणीचे निर्देश दिल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने प्रकल्पाच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.
- सहा मार्गांशी जोडणी; वाहतूककोंडीला पर्याय
या उन्नत मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे तो सहा महत्त्वाच्या विद्यमान आणि प्रस्तावित रस्त्यांना जोडला जाणार आहे. कोपरी-पटणी खाडी पूल, ऐरोली-काटई मार्ग, घाटकोपर-कोपरखैरणे जोडरस्ता, शीव-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आणि उलवे किनारी मार्गाशी या प्रकल्पाची जोडणी होणार आहे. त्यामुळे ठाणे आणि परिसरातून येणाऱ्या वाहनांना शहरांतर्गत वाहतूककोंडी टाळून विमानतळाच्या दिशेने जाणे शक्य होणार आहे.या मार्गावर हलकी व्यावसायिक आणि प्रवासी वाहने धावू शकतील. मात्र, अवजड बहुआसनी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीला प्राधान्य देण्याचे नियोजन आहे. - 40 वर्षांचा सवलत कालावधी; तीन वर्षांत बांधकामाचे नियोजन
या प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 5 जानेवारी 2027 असून 6 जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. प्रकल्पाचा एकूण सवलत कालावधी 40 वर्षांचा असून त्यामध्ये बांधकामासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र मार्गिका पूर्ण करण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान सिडकोसमोर असणार आहे. या मार्गाच्या संचालनासाठी 37 वर्षांचा कालावधी समाविष्ट करण्यात आला आहे. - केंद्र आणि राज्याकडून 2170 कोटींचे अनुदान
प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडूनही मदत मिळणार आहे. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सक्षम समितीने 29 ऑगस्ट 2026 रोजी व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 36 टक्क्यांपर्यंत, म्हणजेच 2 हजार 170.08 कोटी रुपयांच्या अनुदानास तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्र सरकारचा 1 हजार 205.60 कोटी रुपये, तर राज्य सरकारचा 964.48 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे. यापूव राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी 6 हजार 363 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. - पर्यावरणीय परवानग्यांचे आव्हान
प्रकल्पाच्या बांधकामासाठी आवश्यक सागरी किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड), वन आणि अन्य वैधानिक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या परवानग्या मिळवून प्रत्यक्ष बांधकामाला गती देणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आणि निर्धारित कालावधीत मार्गिका कार्यान्वित करणे या टप्प्यांवर सिडकोची कसोटी लागणार आहे. निविदेचे दस्तावेज सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, याबाबत सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ अधिकारी प्रिया रातांबे यांनी माहिती दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai