नवी मुंबईत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते रविवारी (दि. 17 जानेवारी) नवी मुंबईत एकत्र आले होते. यावेळी आ. गणेश नाईक यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे नवी मुंबईत 25 वर्ष एकहाती सत्ता गाजवणार्‍या नाईकांसमोर पहिल्यांदाच तगडं आव्हान उभं राहिल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणे आहे.

वाशीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने काँग्रेस नेते अस्लम शेख, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार राजन विचारे आदी नेते या मेळाव्यात उपस्थित आहेत. या निमित्ताने विजय नाहटा यांची पर्यावरण प्राधिकरणाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने अस्लम शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीचा नवी मुंबईतील हा पहिलाच मेळावा आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. आता नवी मुंबई महापालिकेतही त्याची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 गणेश नाईक हे विकासासाठी नव्हे, तर स्वार्थासाठी भाजपमध्ये गेले असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सत्तेसाठी नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका आव्हाड यांनी केली. पवारांची ही जखम भरुन काढण्याचे काम आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.  तर नवी मुंबईतील सत्ताधार्‍यांना फक्त टक्केवारीमध्ये रस होता असा आरोप शिवसेना नेते विजय नाहटा यांनी मेळाव्यात केला. खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅप करून भाजप वर आली आहे. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनासोबत इतके वर्ष होती. ज्यांचा बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात त्याच सेनेला हे सपवंत होते. आता शिवसेना चांगलं काम करतंय तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला, असा घणाघात अस्लम शेख यांनी केला.

मी कुणाला घाबरत नाही - आ.गणेश नाईक
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात नेत्यांनी आ. गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्याचा आ.गणेश नाईकांनी खरपूस समाचार घेतला. मी कुणाला घाबरत नाही आणि कुणाचे नाव घेऊन टीका ही करत नाही. 25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलेय. मी आजवर कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. भ्रष्टाचार केला, असा आरोप ते करीत असतील तर आरोप सिद्ध करा, असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले. मी भाजपमध्ये  आहे आणि राहीन. मी भाजप सोडणार नाही. महापौर भाजपचाच बसेल, असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. ज्यांना जी टीका करायची ती करू द्या. मी जनसेवेचा वसा कायम ठेवेन, असंही आ. गणेश नाईक विरोधकांना उद्देशून म्हणालेत.