गणेशोत्सवासाठी 170 कृत्रिम विसर्जन तलाव सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 21
6 फुटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आवाहन
नवी मुंबई नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम; 22 पारंपरिक विसर्जनस्थळांवरील गर्दीही होणार कमी
नवी मुंबई : पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा मोठ्या प्रमाणावर तयारी केली असून, श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात तब्बल 170 कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली असून, नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फुटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मोठ्या मूर्तींसाठीही शक्यतो कृत्रिम विसर्जन तलावांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. तसेच सजावटीमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून कापड, कागद व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करावा, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कर्णकर्कश आवाज टाळून मर्यादित ध्वनिक्षेपक व वाद्यांचा वापर करावा तसेच लेझर लाईटचा वापर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील यामध्ये बेलापूर विभागात 22, नेरुळ विभागात 29, वाशी विभागात 16, तुर्भे विभागात 21, कोपरखैरणे विभागात 16, घणसोली विभागात 16, ऐरोली विभागात 25 व दिघा विभागात 14 गावांसह 25 अशाप्रकारे एकूण 170 कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. संबंधित परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत तलावांची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवी मुंबईत सध्या 22 पारंपरिक विसर्जनस्थळे आहेत. या ठिकाणी गणेशभक्तांची होणारी मोठी गर्दी विभागली जावी आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जमा होऊ नयेत, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येत आहे. कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होत असल्याने हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे.
दरम्यान, नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांवर महापालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वयंसेवक, जीवरक्षक, अग्निशामक दल, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि निर्माल्य वाहतूक यांसह तराफे व फोर्कलिफ्टसारखी यंत्रसामग्रीही सज्ज ठेवण्यात येणार आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस विभागाने उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नियोजन केले आहे. ‘पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी नागरिकांनी शक्य असल्यास घरच्या घरी अथवा नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी श्रीमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai