मतदार यादीत घोळ करणार्‍यांची चौकशी करा

शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचे आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक तोंडावर येताच प्रारूप मतदार यादीत बोगस मतदारांची हजारोंच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. विधानसभा निवडणुकी नंतर पन्नास हजारापेक्षा जास्त बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार यादीत घोळ करणार्‍यांची विशेष चौकशी समिती (एसआयटी) मार्फत चौकशी करा आणि बोगस मतदारांवर फौंजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेना उपनेते यांनी आफल्या शिष्टमंडळासह निवदेनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी नुकतीच नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन मतदार याद्यात झालेल्या घोळाबाबत व वाढीव मतदार संख्येबाबत चर्चा केली. औद्योगिक क्षेत्रातील हाऊसमध्ये काही महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना हाताशी धरून तसेच त्यांना लॅपटॉप पुरवून ऑनलाईन तसेच ऑफलाईन बोगस मतदार नोंदण्याचे काम करण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांना पुराव्यासह देण्यात आली. शहरा बाहेरील बोगस मतदार मतदानाच्या दिवशी मतदान करतात. याच बोगस मतदारांचे यादीत नावे असून सदर मतदारांची संख्या पन्नास हजारांच्या वर आहे.

मतदार यादीत झालेल्या बोगस मतदारांची व यामागे असणार्‍या नेत्यांची एसआटीमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच बोगस मतदारांसह दोषी नेत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाहटा यांनी आपल्या शिष्टमंडळासह आयुक्तांना निवदेन देऊन करण्यात आली. तसेच चौकशी समितीत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, माजी नगरसेवक शिवराम पाटील, रामआशिष यादव, रोहिदास पाटील, परिवहन समिती सदस्य समीर बागवान इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.