पाच प्राणवायु प्रकल्पांची कार्यवाही सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 23, 2021
- 655
20 मेट्रिक टन प्राणवायू निर्मितीसाठी पालिकेचे नियोजन
नवी मुंबई : पहिल्या व दुसर्या लाटेत आलेल्या अनुभवामुळे जास्त प्राणवायुची गरज असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिसर्या लाटेपूर्वी 100 मेट्रिक टन प्राणवायू निर्मितीची घोषणा पालिका प्रशासनाने केली होती, मात्र ठेकेदाराला प्राणवायू खरेदीची हमी हवी असल्याने हा प्रकल्प सध्या बारगळला आहे. त्यामुळे प्रशासनाने हवेतील प्राणवायू संकलित करणारे दहा प्रकल्प रुग्णालयांत उभारण्याचे ठरविले आहे. यातील पाच प्रकल्पांची कार्यवाही सुरू केली आहे.
कोरोना रुग्णासाठी प्राणवायू ही मोठी गरज असून कोरोनाच्या दुसर्या लाटेत प्राणवायू तुटवडा निर्माण झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यात कोरोनाची तिसरी लाट ही मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने या काळात प्राणवायूची खूप मोठी गरज भासणार आहे. दुसर्या लाटेत शहराला 20 मेट्रिक टन प्राणवायूची गरज होती. मात्र तीही भागविताना प्रशासनाची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने पीपीपी तत्त्वावर 100 मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली होती. यातील 50 मेट्रिक टन प्राणवायू पालिका शहरासाठी वापरणार होती तर ठेकेदाराला 50 मेट्रिक टन प्राणवायू इतरांना विकण्याची परवानगी देण्यात येणार होती. मात्र प्रकल्प खर्च व ठेकेदाराला आवश्यक असलेली प्राणवायू खरेदीची हमी यामुळे हा प्रकल्प अद्याप कागदावरच राहिला आहे.
दुसर्या लाटेनंतर स्थिर झालेली रुग्णसंख्या आता वाढत आहे. ही रुग्णवाढ कायम राहिली तर तिसर्या लाटेचे शहरासाठी संकट असल्याचा धोका पालिका प्रशासनाने वर्तवला आहे. या लाटेत दुसर्या लाटेपेक्षा मोठी रुग्णसंख्या राहणार असून प्राणवायूची गरज भासणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता हवेतील प्राणवायू वेगळा करून तो संकलित करणारे सरासरी दोन मेट्रिक टन निर्मितीचे दहा प्राणवायू प्रकल्प उभारण्यावर भर दिला आहे. प्रत्येकी सरासरी 2 कोटी खर्चाचे हे प्रकल्प असून त्यातून 18 ते 20 टन प्राणवायू निर्मिती होणार आहे. हे प्रकल्प वाशी सिडको प्रदर्शनी केंद्र, वाशी सार्वजनिक रुग्णालय, त्याचप्रमाणे नेरुळ, ऐरोली, तुर्भे, बेलापूर येथील रुग्णालय येथे उभारण्यात येणार आहेत. त्यातील 5 प्रकल्प तत्काळ निर्मितीसाठी पालिकेने काही प्रकल्पांना कार्यादेश दिले आहेत. पहिल्या 5 प्रकल्पातील दोन प्रकल्पांना बेलापूर तसेच ऐरोली मतदारसंघाचे आमदार यांनी त्याच्या फंडातून प्रत्येकी 1 कोटीचा निधी दिला आहे. तर एका प्रकल्पासाठी सामाजिक दायित्व फंडाची मदत मिळाली आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस यातील काही प्रकल्प प्रत्यक्षात येतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. आगामी काही दिवसांत ही कामे वेगात होणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai