ऐरोली-बेलापूर रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 20
प्रवाशांच्या समस्यांवर रेल्वेमंत्र्यांची तातडीची दखल; मध्य रेल्वेला विकासकामांचे निर्देश
नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या समस्यांची अखेर रेल्वे मंत्रालयाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. बंद तिकीट खिडक्या, जीर्ण शौचालये, तुटलेल्या पायऱ्या व फरश्या, अस्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा, अपुरी प्रकाशयोजना, पादचारी पुलांची दुरवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न यांसारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन या समस्यांकडे लक्ष वेधले.
ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स-दरावे आणि बेलापूर या स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे देखभाल-दुरुस्तीची कामे रखडल्याचा मुद्दाही म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, मे 2026 मध्ये सिडकोच्या अखत्यारीतील या सर्व रेल्वे स्थानकांचे मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता स्थानकांची देखभाल, दुरुस्ती आणि प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची आहे.
ऐरोली व रबाळे स्थानकांवरील बंद तिकीट खिडक्या, जीर्ण शौचालये आणि तुटलेल्या पायऱ्या व फरशांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. घणसोली आणि कोपरखैरणे स्थानकांवरील तिकीट काउंटर परिसरातील अस्वच्छता, तर तुर्भे व सानपाडा येथील शौचालयांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि अपुरी प्रकाशयोजना याकडेही लक्ष वेधण्यात आले. जुईनगर आणि नेरुळ स्थानकांवरील पादचारी पुलांची दुरवस्था तसेच तिकीट खिडक्यांवर होणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सीवूड्स-दारावे आणि बेलापूर स्थानकांवरील स्वच्छतेच्या समस्याही रेल्वेमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या.
सर्व स्थानकांवरील पायऱ्या, पादचारी पूल आणि प्रवाशांच्या आसनव्यवस्थेची तातडीने दुरुस्ती करावी, शौचालयांचे नूतनीकरण करून 24 तास स्वच्छता राखावी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सर्व तिकीट खिडक्या नियमित सुरू ठेवाव्यात, तसेच पुरेशी प्रकाशयोजना आणि एलईडी दिवे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपी आणि आरपीएफची गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांची रेल्वेमंत्र्यांनी गंभीर दखल घेत मध्य रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व स्थानकांवरील आवश्यक विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील हजारो दैनंदिन रेल्वे प्रवाशांना आगामी काळात अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त प्रवासाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai