डीपीएस तलाव परिसराचे संवर्धन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 19
नेरुळ सेक्टर 52-ए हा फ्लेमिंगो कन्झर्वेशन झोनमध्ये समावेश करण्यावर चर्चा
वन्यजीवांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश
नवी मुंबई : नवी मुंबईतील फ्लेमिंगो अधिवासाचे संरक्षण आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने डी.पी.एस. तलाव परिसराच्या विकासासह नेरुळ सेक्टर 52-ए परिसराचा फ्लेमिंगो कन्झर्वेशन झोनमध्ये समावेश करण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत फ्लेमिंगोंसाठी पोषक नैसर्गिक अधिवास कायम ठेवण्यासह परिसरातील जैवविविधतेच्या संरक्षणावर चर्चा करण्यात आली.
नवी मुंबईची ओळख आणि पर्यावरणीय वैभवामध्ये फ्लेमिंगोचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करून नैसर्गिक परिसंस्था अबाधित ठेवण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी नवी मुंबईतील फ्लेमिंगो अधिवासाच्या संवर्धनाबाबत भूमिका स्पष्ट केली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
एनआरआय कॉलनी परिसरात सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आढळत असल्यास त्या परिसराचेही त्यादृष्टीने संरक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. फ्लेमिंगोंसोबतच सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि अन्य वन्यजीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सिडको आणि संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. डी.पी.एस. तलाव परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन तेथील नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन, तसेच नेरुळ सेक्टर 52-ए परिसरातील वन्यजीवांचे अस्तित्व कायम राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नवी मुंबईतील विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखत फ्लेमिंगो व अन्य वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीला नगरसेविका नेत्रा शिर्के, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सिडकोचे अधिकारी रविंद्र मानकर, नवी मुंबई पर्यावरण ग्रुपचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai