काळेंच्या अटकेसाठी महिला पदाधिकारी आक्रमक

महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप करुन त्यासंदर्भात नेरुळ पोलीस स्थानकात तक्रार करुन गुन्हा दाखल केला आहे. मात्र 8 दिवस उलटूनही त्यांना अटक झाली नसल्याने महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी तकाळेंच्या अटकेसाठी आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन अटकेची मागणी केली आहे. 

मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांची पत्नी संजीवनी काळे यांनी त्यांच्यावर मारहाण, जातीवाचक शिवीगाळ व विवाह्यबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार करुन गुन्हा नोेंदविला आहे. मात्र अद्याप काळे यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सेटलमेंटसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही संजीवनी यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता गजानन काळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या 10 ते 15 महिलांनी गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, मोजक्या महिलांनाच यावेळी गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी परवानगी देण्यात आली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी या महिलांशी चर्चा केली. त्यामुळे आता गजानन काळे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तशी माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे. 

रामदास आठवलेंना साकडे
गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे आणि त्यांच्या परिवाराने मंगळवारी रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले. 
काळे लवकरच पोलीसांच्या ताब्यात
संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. गेल्या सहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला.