500 चौ. फुटांच्या घरांना मिळणार मालमत्ता करात सूट
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 05, 2022
- 433
आरक्षणांची पुन्हा छाननी करून आरक्षण हटवण्याबाबत अंतिम निर्णय - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नवी मुंबई ः नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौर्यावेळी दिली. सिडको आरक्षित भूखंडावरील आरक्षणांची पुन्हा छाननी करून त्यानंतरच आरक्षण हटवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचा पुनरुच्चार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तोपर्यंत याआधी नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई मनपाने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याबद्दल नक्की सकारात्मक विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी सोमवारी नवी मुंबईतील सिडको प्राधिकरणाद्वारे सुरू असलेल्या अनेक विकासकामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
नगरविकास मंत्र्यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन नवी मुंबई मेट्रो, नेरुळ व बेलापूर जेट्टीसह इतर प्रकल्पांना भेटी दिल्या. सिडकोच्या वतीने सुरू असलेले प्रकल्पांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी त्यांनी भाऊचा धक्का ते नेरूळ जेट्टी दरम्यान बोटीने प्रवास करून शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पाची पाहणी केली. भारतातील सगळ्यात मोठा म्हणजे 22किमी लांबीचा पारबंदर (सीलिंक) प्रकल्प रु.18000कोटी खर्च करून उभारण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी नेरूळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जेट्टीची पाहणी केली. त्याच ठिकाणी त्यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावाही घेतला. यावेळी खासदार राजन विचारे, विजय नहाटा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एस. एस. पाटील यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सिडकोच्या वतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच सिडकोच्या आवास योजनेतील घरांचे बांधकाम, प्रस्तावित नावडे येथील टाऊनशिप, नवी मुंबई विमानतळ, नैना विकास आराखडा, नेरुळ जलवाहतूक टर्मिनल, नेरूळ-बेलापूर-खारघर सागरी मार्ग, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी पुर्नप्रक्रिया, खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, वाशी येथील ठाणे खाडीपूल, पालघरमधील प्रशासकीय इमारती आदी प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला. नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले की, सिडकोने पालघरप्रमाणेच नवी मुंबईतील प्रकल्पांची कामे दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. सिडकोच्या वतीने उभारण्यात आलेल्या व पुढील काळात उभारण्यात येणार्या रेल्वे स्थानकांवर सरकत्या जिन्याची सोय करण्यात यावी. सिडकोच्या विविध प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
- मेट्रोच्या कामाची गती वाढवा
नेरुळ येथील जेट्टीच्या पाहणीनंतर पालकमंत्री शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी बेलापूर येथील जेट्टीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी खारघरमधील सेंट्रल पार्क मेट्रो स्थानक येथे भेट देऊन मेट्रोची पाहणी केली. तसेच सेंट्रल पार्क मेट्रोे स्थानक ते पेणधर मेट्रोेेस्थानक असा प्रवासही त्यांनी मेट्रोमधून केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. नवी मुंबईतील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या 4 स्थानकांची पाहणी करून रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाल्यास लवकरात लवकर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या मेट्रो मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दोन डेडलाईन यापूर्वीच उलटल्या असल्याने आता या कामाची गती वाढवण्याची सुचना त्यांनी महामेट्रोच्या अधिकार्यांना दिल्या. तसेच शिंदे यांनी खारघर येथे सुरू असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटरच्या प्रकल्पास भेट दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai