लोकसेवा आयोगाला बेलापुरमध्ये जागा

कोकण भवनाशेजारील 5 हजार 500 चौरस मीटरच्या भुखंडाची निवड

मुंबई ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कामाकाज सध्या मुंबईत तीन ठिकाणांवरुन चालते. या आयोगाचे काम गुप्त आणि संवेदनशील असल्याने एकाच छताखालून याचे कामकाज होण्यासाठी प्रशस्त इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. सीबीडी बेलापूर येथे कोकण भवनाशेजारी 5 हजार 500 

चौरस मीटर जागा त्यासाठी दिली जाणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय सध्या फोर्टमधील बँक ऑफ इंडिया इमारत, माझगावचे विक्रीकर भवन तसेच महानगर टेलिफोन निगमची इमारत अशा तीन ठिकाणी चालते. आयोगाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील प्लॉट क्र. सात, सेक्टर 10 मधील सिडकोला दिलेल्या 10 हजार चौरस मीटर भूखंडापैकी साडेपाच हजार चौरस मीटरची जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयासाठी देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. 

सिडकोच्या ताब्यातील 10 हजार चौरस मीटरचा हा भूखंड 1984 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. यापैकी दोन हजार चौरस मीटरची जागा तात्पुरत्या स्वरूपात बेलापूर मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात आली 

आहे. उर्वरित 8 हजार चौरस मीटरपैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी 5 हजार 500 चौ.मी. आणि केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नवी मुंबईतील कार्यालयासाठी 2 हजार 500 चौ.मी. जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.