शासनाला बोगस रॉयल्टीमुळे चुना

एनआरआय पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

नवी मुंबई ः  शासनाच्या महसुल विभागाच्या स्वामीत्व धनाच्या बोगस व बनावट पावत्या छापुन शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणार्‍या आरोपींना एनआरआय पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक धेंडे पोलीसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मंगळवारी एनआरआय पोलीसांनी तुर्भे येथे छापा मारुन शासनाच्या बनावट रॉयल्टी बनवून ते विकणार्‍या आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर  बनावट शासकीय वाहतुक परवान्यांच्या पावत्या हस्तगत केल्या आहेत. हे परवाने जिल्हाधिकारी ठाणे व रायगड यांच्या नावाने छापुन ते नवी मुंबईतील अनेक वाहतुक ठेकेदारांना वितरीत करण्यात येत होते. सदर आरोपींना एनआरआय पोलीसांनी न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस चौकशीदरम्यान उपलब्ध होणार्‍या माहितीवरुन पोलीस पुढील तपास करणार असून त्यामुळे अनेक धेंड्यांना पोलीसांचा हिसका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाल्याचे बोलले जात असून हा गोरख धंदा गेली अनेकवर्षे बिनबोभाट सुरु असल्याचे सांगितले जाते. तुर्भे स्टोअर्स येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या तक्रारीनंतर शासनाने त्वरीत पावले उचलल्याने आरोपींना पकडने पोलीसांना सोपे गेले आहे. हा तपास एनआरआय पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक कापडनीस करत असून भविष्यात या तपासात मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.