आवक घटल्याने लसणाचे भाव दुप्पट
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 09, 2023
- 413
नवी मुंबई : उत्पादन कमी असल्याने लसणाच्या भावात वाढ होत होती. गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत चांगला लसूण 200 रुपये प्रतिकिलो या भावाने मिळत होता. या आठवड्यात लसणाच्या भावाने आणखी उसळी घेतली असून घाऊक बाजारात चांगला लसूण 350 रुपये किलोपर्यंत गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचा भाव प्रतिकिलो 400 रुपये झाला आहे.
मागील दोन वर्षांत लसणाचे भाव खूपच कमी झाले होते. त्यामुळे घाऊक बाजारात लसूण प्रतिकिलो 50 ते 80 रुपयांना मिळत होता. हे लसणाचे सर्वसाधारण भाव आहेत. भाव पडत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन घेणे थांबवले. त्यामुळे आता बाजारात लसणाची कमतरता जाणवायला लागली आहे. परिणामी मागच्या सहा महिन्यांपासून लसणाचा भाव प्रतिकिलो 200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता हे भाव आणखी वाढले आहेत. लसणाच्या भावाने प्रतिकिलो 300 रुपयांचा टप्पा पार केला आहे. घाऊक बाजारात गुरुवारी लसूण प्रतिकिलो 150 ते 350 रुपये भावाने विकला गेला. तिसऱ्या क्रमांकाच्या लहान पाकळ्या असलेल्या काहीशा सुकलेल्या लसणाचा भाव प्रतिकिलो 150 रुपये होता. मध्यम आकाराच्या लसणाला प्रतिकिलो 200 रुपये भाव मिळाला. तर, सर्वांत चांगला आणि मोठ्या पाकळ्या असलेला लसूण 350 रुपये किलो या भावाने विकला गेला.
- पुढील सहा-सात महिने भाव चढाच
घाऊक बाजारात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमधून लसणाची आवक होत असते. सर्वच ठिकाणी समान परिस्थिती आहे. त्यामुळे यावेळी लसणाची कमतरता जाणवणार असल्याचे चित्र बाजारात आहे. लसणाचे नवीन उत्पादन यायला जून-जुलै महिना उजाडणार आहे. तोपर्यंत लसणाची कमतरता जाणवत राहणार आहे. परिणामी पुढील सहा-सात महिने लसणाचा भाव चढाच राहणार आहे, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.
- गेल्या आठवड्यातील भाव : 200 रुपये किलो
- सध्याचा भाव : 400 रुपये किलो
- घाऊक बाजारात : 150 ते 350 रुपये किलो
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai