नैनामध्ये रस्त्यांसाठी 3,114 कोटी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 16, 2024
- 385
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सिडकोने या क्षेत्रात रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल 3,114 कोटी रुपये खर्चाच्या कामाचे प्रस्ताव मागविले आहेत. विशेष म्हणजे, ही कामे सहा टप्प्यांत पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे बंधन या प्रक्रियेत पात्र ठेकेदारांवर असणार आहे.
नैना क्षेत्राच्या विकासाला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात रस्त्यांसह इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या नैनाचा पायलट प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या आणि 23 गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात 12 नगर रचना परियोजना (टीपीएस) प्रस्तावित आहेत. त्यापैकी टीपीएस क्रमांक 2 ते 7 मध्ये प्रमुख आणि अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या, गटारे, पथदिवे आदींची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना सिंघल यांनी दिल्या आहेत.
- प्रस्तावित कामांचा तपशील
टीपीएस क्रमांक 2 ते 7 मध्ये रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रस्तावित केल्या आहेत. टीपीएस क्रमांक 2 व 3 मध्ये 27 मीटर आणि 20 मीटर रुंदीचा अंतर्गत रस्ता तसेच गटारे, नाले, पदपथ आदींसाठी 178 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. तर टीपीएस क्रमांक 4, 5, 6 आणि 7 मध्ये 20 मीटर, 27 मीटर आणि 27 मीटर रुंदीच्या रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांसाठी 526 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे टीपीएस क्रमांक 2 ते 7 मध्ये 60 मीटर आणि 45 मीटर रुंदीचा बाह्य रस्ता, त्यावरील लहान मोठे उड्डाणपूल, पथदिवे आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी 2,389 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. - 7 हजार 500 कोटींचा भार
नैना क्षेत्राच्या विकासावर टप्प्या-टप्याने 7 हजार 500 कोटी रुपये खर्च करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकात विशेष आर्थिक तरतूद केली जात आहे. गेल्या वर्षी या विभागातील अंतर्गत रस्ते, मलवाहिन्या आणि पदपथांच्या कामासाठी सिडकोने 1200 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच 3,114 कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai