33 मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता अटकावणी
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 07, 2025
- 334
10 जणांकडून 5 कोटी 12 लक्ष वसूली
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ताकर विभागामार्फत प्रभावी करवसूलीकडे विशेष लक्ष दिले जात असून थकबाकीदारांना आवाहन करून, नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत नोटीसीला प्रतिसाद न देणाऱ्या 33 मोठ्या थकबाकीदारांवर मालमत्ता अटकावणीची कारवाई करण्यात आली असून 5 कोटी 12 लक्ष इतकी वसूली रक्कम महापालिकेकडे जमा झालेली आहे.
नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ताकर हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून त्यामधूनच नागरिकांना गुणात्मक सेवासुविधा पुरविल्या जातात. मालमत्ताकरापोटी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात 900 कोटी रक्कमेचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले असून आत्तापर्यंत 617 कोटी इतक्या रक्कमेची वसूली झालेली आहे. या करवसूली प्रक्रियेत महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार 1 लाखापेक्षा अधिक रक्कमेचे थकबाकीदार असणा-या मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून अशा 8 हजार मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. तथापि नोटीसांची मुदत संपूनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून त्या अंतर्गत 33 थकबाकीदारांवर मालमत्ता अटकावणीची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामधील 10 थकबाकीदारांनी 5 कोटी 12 लक्ष इतकी रक्कम जमा केलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत थकित रक्कम त्वरित भरणा करून शहराच्या विकास प्रक्रियेला हातभार लावण्याचे आवाहन प्रारंभी करण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या. आता नोटीसांना प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
त्यानुसार 6 फेब्रुवारी 2025 रोजी अमेय को-ऑप.हौ.सोसायटीमधील 1 लक्ष रक्कमेहून अधिक थकित मालमत्ताकर असणाऱ्या 68 व्यापारी गाळ्यांची एकूण थकबाकी रक्कम रू. 5.32 कोटी इतकी असून त्याच्या वसूलीसाठी सदरचे 68 व्यापारी गाळे जप्त (सील) करण्यासाठी जप्ती अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर गाळे जप्त करूनही जर त्यांनी 5 दिवसात थकबाकीची रक्कम भरणा केली नाही तर सदर व्यापारी गाळ्यांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यापुढील काळात थकबाकीदार सोसायट्यांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मालमत्ता जप्तीची कारवाई करूनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलाव करण्याची कारवाई देखील सुरू करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai