जागतिक जलदिनानिमित्त सामुहिक जलशपथ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 211
नवी मुंबई ः पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असून पाण्याला जीवन असेही संबोधले जाते. 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पालिकेचे विविध विभागांमध्ये असणारे जलकुंभ तसेच पम्पींग हाऊस त्याचप्रमाणे मोरबे धरण प्रकल्प व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र याठिकाणी सामुहिक जलशपथ घेण्यात आली.
पिण्यायोग्य पाण्याचे पृथ्वीवरील अत्यल्प प्रमाण लक्षात घेऊन उपलब्ध जलस्त्रोतांचे संवर्धन करणे व पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे लक्षात घेत संयुक्त राष्ट्र संघाने 1993 पासून 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचे महत्व अधोरेखित करीत जगभरात संपन्न होणाऱ्या यावषच्या जागतिक जलदिनाचा विषय ‘हिमनदी संवर्धन’ हा आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध विभागांमध्ये जलजागृतीविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. महानगरपालिकेचे विविध विभागांमध्ये असणारे जलकुंभ तसेच पम्पींग हाऊस त्याचप्रमाणे मोरबे धरण प्रकल्प व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र याठिकाणी सामुहिक जलशपथ घेण्यात आली. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे व इतर अभियंते व अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक नागरिकांनीही सहभागी होत जलशपथ घेतली.
आपण या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. यासाठी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची मी शपथ घेत आहे अशा आशयाच्या जल शपथेमध्ये पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच पाण्याचा थेंब अन् थेंब साठवून ‘कॅच द रेन’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी मी संपूर्ण सहयोग देईन व पाण्याला एक अनमोल संपदा मानून पाण्याचा वापर करेन अशीही शपथ घेण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मी, माझे कुटुंबिय व मित्र आणि शेजाऱ्यांना प्रेरीत करेन असेही प्रतिज्ञेत नमूद आहे. नवी मुंबई हे स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे जलसमृध्द शहर असले तरी प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला किती पाण्याची गरज आहे हे ओळखून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन फ्लेक्स बॅनर्स, स्टँडीज्, होर्डींग अशा विविध माध्यमांतून जागतिक जलदिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
- सिडकोतर्फे प्रभात फेरी
नवी मुंबई ः जागतिक जल दिनानिमित्त 24 मार्च 2025 रोजी सिडको महामंडळाच्या पाणी पुरवठा विभागातर्फे सिडको पाणी पुरवठा कार्यालय, सेक्टर-1एस, नवीन पनवेल ते बांठिया माध्यमिक विद्यालय, सेक्टर-18, नवीन पनवेल दरम्यान सकाळी 8.00 वाजता प्रभात फेरी काढण्यात येऊन नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासह पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.
गोड्या पाण्याचे व या पाण्याच्या संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवष 22 मार्च हा जागितक जल दिन म्हणून साजरा केला जातो. सिडकोच्या नवीन पनवेल येथील पाणी पुरवठा कार्यालय येथे प्रभात फेरीचा प्रारंभ होऊन बांठिया विद्यालय येथे समारोप करण्यात आला. प्रभात फेरीमध्ये बांठिया विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व लेझीम पथकाने सहभाग घेतला. घोषणा देऊन तसेच फलक दर्शवून पाणी बचतीचा संदेश यावेळी देण्यात आला. सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पाण्याचे महत्त्व पटवून दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai